जि.प. स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात कार्यक्रम

तालुका प्रतिनिधी / १३ एप्रिल काटोल – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेतांना खुप संघर्ष करावा लागला. मात्र शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांना माहित होते. सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांना विदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली म्हणून ते ‘बॅरीस्टर’ होऊ शकले. मात्र डॉ. आंबेडकरांनी इतर विदयार्थाना उच्च शिक्षणासाठी मदत करून समाजाचे ऋण फेडले असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. चंदु देशपांडे यांनी जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. चंदू देशपांडे, प्रमुख अतिथी म्हणून केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे देशपांडे म्हणाले, आंबेडकरांच्या काळात समाज चातुर्वर्ण व्यवस्थेच्या गुलामगिरीत होता. म्हणून मनुस्मृतीचे दहन बाबासाहेबांनी केले. मात्र आजचा युवक सोशल मिडीया व राजकीय पक्षाच्या गुलामगिरीत जीवन व्यथीत करीत आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्याखाली युवक गोळा होत आहे. मात्र युवकांनी ‘तिरंगा’ या एकाच झेंडयाखाली एकत्रित येणे काळाची गरज आहे. संविधानाला सर्वाच्च स्थानी मानले तर समाजाचे कल्याण होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष लाड, संचालन नोमादेवी सुरपडे तर आभार प्रदर्शन नचिकेत मलमुकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संगणक ऑपरेटर सतिश बागडे, परिचारीका अनुसया रेवतकर, सुरक्षा रक्षक प्रल्हाद पडोळे यांनी सहकार्य केले.
