
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
पाचोरा तालुक्यातील गाळण या छोट्याशा गावातील विलास गणेश राठोड यांची प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट, बेंगलोर येथे निवड झाल्याची आनंदाची बातमी आहे. विलास हा तांड्यातील पदव्युत्तर शिक्षणासाठी बेंगलोरला जाणारा पहिला मुलगा आहे.
विलास एका गरीब अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात वाढलेला आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील, लहान बहिण व भाऊ अशा एकूण ५ लोकांचा समावेश आहे. परिस्थिती अशी होती की सर्व मुलांना शिक्षण देणे शक्य नव्हते; त्यामुळे विलासची बहिण सातवीनंतर शाळा सोडून आई-वडीलांना शेती कामात मदत करू लागली, तर लहान भाऊ आता बारावीपर्यंत शिकला आहे.
विलासने पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, गाळण येथे पूर्ण केले. तो शालेय वयापासून अभ्यासू आणि हुशार मुलगा होता, परंतु गावातील शैक्षणिक सोयी सुविधा, बालविवाह, व्यसनाधीनता, पावसाच्या अनियमिततेमुळे होणारी नापिकी, कर्जबाजारी शेती अशा अनेक अडचणी विलासने प्रत्यक्ष पाहिल्या. या परिस्थितीने त्याला समाजासाठी काहीतरी करायची प्रेरणा दिली.
बारावी नंतर विलासने लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथून समाजकार्य (B.S.W.) पदवी घेतली. या शिक्षणादरम्यान त्याने महिला सशक्तीकरण, युवा विकास आणि ग्रामीण भागातील सामाजिक समस्यांवर काम केले, तसेच फिल्ड वर्क आणि कार्यशाळा घेतल्या. तो म्हणतो, “ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु संधी नसल्यामुळे ती क्षमता विकसित होत नाही.”
शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी विलासने पार्ट-टाइम हॉटेलमध्ये काम केले आणि उच्च शिक्षणासाठी नेहमीच जिद्द ठेवली. आता त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट, बेंगलोर येथे M.Sc. क्लायमेट चेंज सायन्स अँड प्रॅक्टिस या दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड मिळाली आहे. विद्यापीठाने त्याला १५,६५,५२८ रुपये शिष्यवृत्ती दिली असून, दर महिन्याला ८,००० रुपये स्टायफंडही मिळणार आहे.
विलासचे वडील म्हणतात, “आम्हाला शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, पण मुलांनी मनापासून जितके शिकायचे आहे तितके शिकावे. त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोय.”
विलासचे हे यश केवळ त्याच्यासाठीच नाही तर संपूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील आणि शिक्षकांना देतो. त्याचा उद्देश आहे की येत्या काळात गावातील अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकण्याची संधी मिळावी.
ग्रामीण भागातील युवा पिढीला योग्य मार्गदर्शन, व्यसनमुक्त वातावरण, शैक्षणिक संधी आणि प्रशासनाची योग्य साथ मिळाल्यास, अशी मेहनती आणि हुशार मुले निश्चितच उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात, असे विलासच्या उदाहरणातून स्पष्ट होते.
