
लता फाळके /हदगाव
जून महिन्यात सुरू होणारे चालू शैक्षणिक वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबर २०२० नंतर सुरू झाले,एक दिवस आड शाळा सुरू झाल्या असल्याने मिळणाऱ्या कार्यदिनात प्रचंड असा दहावी व बारावीचा ७५ टक्के अभ्यासक्रम चार महिन्यात संपवायचा कसा? तेव्हा या दोन्ही वर्गाच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा बोर्डाच्या परीक्षेनंतर घेण्यात याव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष अनिल दस्तूरकर यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य मंडळाच्या सचिवांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात दस्तूरकर यांनी म्हटले आहे की,बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे, दहावी व बारावीचा ७५ टक्के अभ्यासक्रम मिळणाऱ्या कार्यदिनात म्हणजे चार- साडेचार महिन्यात एक दिवस आड सुरु असलेल्या शाळेत संपवायचा कसा हा प्रश्न शिक्षक,प्राध्यापकांना पडला आहे, त्यातच बोर्डाच्या परीक्षेआधी जर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या तर या परीक्षेस किमान १५ते २० दिवस लागतात त्यामुळे या दोन्ही वर्गाच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा बोर्डाच्या परीक्षेनंतर घेतल्यास या दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी होईल व विद्यार्थीही तनावमुक्त वातावरणात व दडपणाखाली न येता परीक्षा देतील,त्यामुळे या दोन्ही वर्गाच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा बोर्डाच्या परीक्षेनंतर घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली असून निवेदनाच्या प्रती संबंधितांना पाठविल्या आहेत.
