नगरपंचायत स्तरावरील घरकुल धारकरांना रेती (वाळु) उपलब्ध करुन द्या: सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी केली तहसीलदारांकडे मागणी

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर


हिमायतनगर| शहरात प्रधानमंत्री आवास योजनेतुन मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर झाली असून, त्यापैकी अनेक घरकुलाचे बांधकाम सुरु आहेत. मात्र घरकुलाच्या कामाला रेती उपलब्ध होत नसल्याने अनेक गोरगरीबांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न अर्धवट अवस्थेत रखडलेले आहेत. हि स्वप्न पूर्ण होण्यासाठी तात्काळ घरकुल धारकांना रेती उपलब्ध व्हावी यासाठी लिलाव करून घरकुलाचे कामे मार्गी लावावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार डी.एन.गायकवाड यांच्याकडे केली आहे.

घरकुलाचे कामे सुरु आहेत, मात्र शासनाची परवानगी नसल्याने रेती उपलब्ध होत नाही. काही रेतीदादांकडून रेती उपलब्ध झाली तरी अव्वाच्या सव्वा दराने विकत घ्यावी लागत आहे. हे सामान्यांना परवडणारे नसून, रेतीसाठीच मोठा खर्च झाला तर घरकलचे बांधकाम कसे करायचे असा प्रश्न घरकुल धारकांना पडला आहे. शासनाची रेतीघाटाचे लिलाव झाले तर अल्प दरात रेती उपलब्ध होऊन शासनाने मंजूर केलेल्या रक्कमेत घरकुल बांधणे सोईचे होणार आहे. मात्र रेती मिळत नसल्यामुळे अनेकांच्या घरकुलाचे बांधकाम सज्जा लेव्हलपर्यंत येऊन अर्धवट अवस्थेत ठेवण्याची वेळ आली आहे. बहुतांश गोरगरीबांनी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचे हप्ते मिळेपर्यंत घरकुलाच्या बांधकामासाठी व्याजी दिडी काढुन बांधकाम सुरु केलेले आहे. मात्र घरकुलाचा चौथा हप्ता उपलब्ध करून देण्यात नगरपंचायत प्रशासनाचा पाठपुरावा कमी पडत असल्याने अनेक घरकुल धारकांना घरकुलाचा चौथा हप्ता मिळाला नाही. त्यातच रेती (वाळु) अभावि घरकुलाचे बांधकाम थांबलेले आहेत.

शहराच्या 5 कीमी अंतरा वर असलेल्या विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा नदी वाहते आहे. या नदीतुन घरकुल धारकांसाठी शासनाच्या नियमानुसार प्रति लाभार्थींना 10 ब्रास रेती (वाळु) उपलब्ध करुन द्यावी. अशी मागणी अनेक घरकुल धारकांनी मादसवार यांच्याकडे केल्याने त्यांनी तहसीलदार हिमायतनगर यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. तसेच थेट घरकुल धारकांना रेती देता येत नासेल तर तात्काळ रेती घाटाचे लिलाव करून रखडलेल्या घरकुलाचे काम पुर्णत्वास नेण्यास पुढाकार घ्यावा आसनी गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करावे असे निवेदन देऊन विनंती केली आहे. या निवेदनाच्या प्रति मा. हेमंतभाऊ पाटील, खासदार, हिंगोली लोकसभा, मा. माधवराव पाटील जवळगांवकर, आमदार, हदगांव विधानसभा, मा. उपविभागीय अधिकारी साहेब, हदगांव व संबंधितांना पाठविले आहे.
ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील देखील घरकुलाचे बांधकाम केवळ रेती अभावी रखडलेले आहेत. एकीकडे शासन घरकुल योजना अमलात आणते आहे, मात्र यासाठी लागणारी रेती सहजरित्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक घरकुलाचे बांधकाम थांबलेले आहेत. जर रेती घाटाचे लिलाव झाले तर अल्प दारात घरकुल धारकांना रेती उपलब्ध होईल आणि शासनाची घरकुल योजना सफल होण्यास मदत मिळेल असे सामाजिक कार्यकर्ते मादसवार यांनी म्हंटले आहे. यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार, शुद्धोधन हनवते, दिलीप शिंदे, विष्णू जाधव, परमेश्वर शिंदे, सुनील चव्हाण, चांदराव वानखेडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.