प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर| वन परिक्षेत्र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका आता सेवाजेष्ठता कामगारांना बसला असून, सेवा जेष्ठतेनुसार कामावरून कमी केलेल्या कामगारांचे मागील नऊ महिन्याचे वेतन थकले आहे. हे वेतन तत्काळ देण्यात यावे आणि कामावरून कमी केलेल्या कामगारांना परत कामावर रुजू करून घ्यावे. अन्यथा दि.२४ जानेवारीपासून हिमायतनगर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कामगारांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा उंटावरून शेळ्या हाकत केल्या जाणाऱ्या मनमानी कारभाराला कर्मचाऱ्यांसह आता कामगारही वैतागले असल्याचे दिसून येत आहे. कोरोना सारख्या संकट काळात दिवसभर घाम गाळून प्रामाणिक काम करणाऱ्या कामगारांना अधिकाऱ्यांनी मोघम पंटर देऊन कामावर येऊ नये असे तोंडी आदेशित करण्यात येत असल्यामुळे गरीब कामगारांची कुचंबणा होऊन शारीरिक व मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नाहीतर मागील ३० वर्षांपासून वनपरिक्षेत्रात विविध क्षेत्रात कायमस्वरूपी कामगार असताना मागील ९ महिन्यापासून कामच मोबदला म्हणजे पगारी देण्यात आल्या नाही. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज नाहीतर उद्या शासनाचे पैसे मिळतील या आशेने कोरोना काळात इमाने इतबारे काम केले. मात्र मोबदला मिळवून देणे तर सोडा उलट तोंडी आदेशित करून अधिकाऱ्यांनी कामगारांना कामवारर येण्यास मज्जाव घालून कमी केले आहे.
अश्या प्रकारे पगारी न देता अचानकपणे कामावरून कमी करून मानसिक व आर्थिक त्रास दिल्याबद्दल चौकशी करावी. तसेच जागरणं त्रास न देता मोघम पत्र क्रमांक ३०७ दि.२०/१०/२०२० आधारे कामावरून कमी केलेल्या कामगारांना ताबडतोब कामावर रुजू करून घ्यावे. आणि ९ महिन्याचे थकीत वेतन देऊन न्याय मिळून द्यावा. अन्यथा दि. २४ जानेवारी दुपारी १२.३० पासून नाईलाजास्तव हिमायतनगर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाचं प्रति जिल्हाधिकारी नांदेड, स.का. आयुक्त नांदेड, पोलीस निरीक्षक हिमायतनगर, उपवनसंरक्षक वन विभाग नांदेड, अध्यक्ष व सचिव शासकीय औद्योगिक कामगार सांघटना नांदेड, तहसीलदार हिमायतनगर याना देण्यात आले आहेत. या निवेदनावर अर्जदार कामगार बलवान चंदू आडे, सवैराम लछिराम जाधव, धन्नू चंदू राठोड, परसराम संभाजी बोथीगे, भीमराव गणपत वाठोरे, प्रकाश भिक्कू राठोड, आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तालुक्यात वनविभागाच्या वतीने करण्यात आलेली कामे, वृक्ष लागवडीचा बोजवारा उडालेला आहे. हि बाब अनेकदा वर्तमान पात्रात छापून आलेल्या बातम्यांवरून सिद्ध झालेली आहे. एवढेच नव्हे तर तालुक्यात वन्य प्राण्यांच्या शिकारी, वृक्ष तोडीचे वाढते प्रमाण यामुळे हिमायतनगर तालुका नेहमी चर्चेत राहतो आहे. असे असताना देखील वनपरिक्षेत्र अधीकारी हे नांदेडला राहून महिन्यातून दोन – तीन वेळी कर्तव्यावर येऊन जात आसल्याने अनेकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात वन्य प्राण्यांचे हल्ले, आणी पिकांची नासाडी करण्याचे प्रमाण वाढले असले तरी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत.

