

लता फाळके/ हदगाव
तीस हजार लोकसंख्येच्या हदगाव शहरातील गर्भवती माता व बालकांच्या आकडेवारीचे रेकॉर्ड अंगणवाडी कडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. एक हजार लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असणे आवश्यक असताना तीस हजार लोकसंख्येच्या शहराला केवळ दोनच अंगणवाड्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी ची संख्या वाढविणे आवश्यक आहे. असे असताना या बाबीकडे संबंधीताचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. लोकप्रतिनिधी याबाबतीत अतिशय उदासीन आहेत ही बाब चिंताजनक आहे. हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत ही आकडेवारी उपलब्ध करून दिल्या जातात त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गर्भवती माता तसेच स्तनदा मातांसाठी लागणाऱ्या औषधे व बालकांचा आहार यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यास मदत होते परंतु हदगाव शहरात मात्र अशा उपाययोजना करण्यासाठी अंगणवाडीमध्ये कोणतीही आकडेवारी नसल्याचा दावा शिवसेना नगरसेविका विद्या ताई भोस्कर यांनी केला आहे. शहरातील बाळंतपणात झालेल्या महिलांचे मृत्यू तसेच बालमृत्यू यांची माहिती फक्त दवाखान्यातच उपलब्ध होते. अंगणवाडीसेविका यांच्या कडे याबाबतीत कोणतीही माहिती उपलब्ध नाही अशामुळे गरोदर माता व बालक यांच्यावरील उपचाराचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शहरात फक्त दोनच अंगणवाडी अस्तित्वात आहे त्यामुळे कमीत कमी हदगाव शहरात 15 अंगणवाड्या उपलब्ध करून द्याव्यात याबाबतीत संबंधितांना तातडीने आदेश देण्याची विनंती नगरसेविका विद्याताई भोस्कर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केली आहे आणि थेट मुख्यमंत्री कार्यालयास याबाबतीत अवगत करण्यात आले आहे.
