सास्ती-बल्लारपूर विभागातील गोवरी हजेरी नोंदणी कार्यालय डंपरच्या धडकेत जमीनदोस्त, चार जण गंभीर जखमी

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा

राजुरा : काही दिवसांपासून सास्ती बल्लारपूर एरियाच्या वेकोलीमध्ये गलथान कारभारामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे आणि आज त्याचा पुन्हा एक नमुना पहावयास मिळाला आहे, वेकोली गोवरी हजेरी नोंदणी कार्यालय आज सकाळी ८:४० च्या दरम्यान डंपर(डंपर क्रमांक 60502) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हजेरी नोंदणी कार्यालय अपघाताच्या विळख्यात आले,हा अपघात एवढा मोठा होता की यात हजेरी नोंदणी कार्यालय जमीनदोस्त झाले, यात चार जण जखमी असून दोघेजण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात प्रभाकर चन्ने, प्रसाद साहेब, मायनिग सरदार जे. पी. महाथो, अंडर मॅनेजर साखरे साहेब यांचा समावेश असून महाथो व साखरे यांना गंभीर दुखापत झाली असून यांना डब्ल्यूसीएल एरिया हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. डंपर मेंटनन्सकरिता नेत असतांना चालकाच्या अनवधानाने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दबल्याने हा मोठा अपघात घडला. चालक शामराव मुसळे अंदाजे ५० वर्ष असून तो डंपर सेक्शन फिटर पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. वेकोलीचा हा एरिया मागील काही दिवसांपासून निरनिराळ्या कारणांनी अतिशय चर्चेत आहे,सुरक्षेचे ढिसाळ नियोजन,अधिकाऱ्यांची अरेरावी या सर्व गोष्टी अपघात होण्यास कारणीभूत ठरत आहे.