वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी दारू पकडली. ,साडे नऊ लाखांच्या मुद्देमालासह दोन संशयित व एक आलीशान कार जप्त, वडकी पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


कळंब येथून राळेगाव मार्गे वर्धा जिल्ह्यात जाणाऱ्या अवैध देशी दारूच्या २६ पेट्या वडकी पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत दोन संशयित आरोपींसह एक आलीशान कार जप्त केली.हि कारवाई वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकी गावाजवळ १९ जुनच्या मध्यरात्री करण्यात आली.
लगतच्या कळंब येथून राळेगाव मार्गे वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वर्धा जिल्ह्यात एका चार चाकी वाहनातून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहिती वरुन वडकी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनायक जाधव यांनी हद्दीतील खडकी ते चहांद या मार्गावर सापळा रचला.दरम्यान खबऱ्या कडून मिळालेल्या वर्णनानुसार एम.एच.०४ एच.एन.०४२५ या सिल्व्हर कलरच्या मोबीलीओ वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये देशी दारू गोवा कंपनीच्या २६ पेट्या आढळून आल्या.या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी गणेश पोटेफोडे व अमोल आखाडे दोन्ही रा.कळंब यांना अटक करून त्याचे विरोधात दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा कायम केला व देशी दारूच्या २६ पेट्या अंदाजे किंमत ७४ हजार ८८० रुपये, दोन मोबाईल अंदाजे किंमत २२ हजार रुपये व आलीशान वाहनाची अंदाजे किंमत ९ लाख रुपये असा एकूण ९ लाख ९६ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान दारुची अवैध वाहतूक करणारे पोलीसांना गेल्या अनेक दिवसांपासून चकमा देत होते त्यामुळे पोलिसांच्या हालचाली वर नजर ठेवून असल्याच्या संशयावरून पोलिसांनी अतीशय चपळाईने सापळा रचला होता व रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून हि कारवाई केल्याचे ठाणेदार जाधव यांनी सांगितले. हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात वडकीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनायक जाधव बिट जमादार रमेश मेश्राम,सुरज चिव्हाने, विजय बसेशंकर व शंकर जुमनाके जगदीश डेरे संदीप मडावी यांच्या पथकाने पार पाडली.