आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

आनंदवन / दिनांक : २ ऑक्टोंबर २०२१

                    

महारोगी सेवा समिती वरोरा,द्वारा संचालित तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, संलग्नित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन,वरोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा रोटरी क्लब ऑफ वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी भूषविले. दीपप्रज्वलन व महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
रोटरी क्लब ऑफ वरोरा चे अध्यक्ष मा. हिरालाल बघेले यांनी या प्रसंगी बोलताना म्हंटले की,’ राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने आम्ही प्रत्येक महाविद्यालयांमध्ये रोटरी क्लब शाखेचे लवकरच उद्घाटन करणार आहोत, त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब समवेत काम करता येईल.याप्रसंगी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शुभेच्छा ही दिल्या.
रोटरी क्लबचे पदाधिकारी डॉ. सागर वझे यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले की, ज्या पद्धतीने महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये इंग्रजांना चले जावचा नारा दिला आहेत त्याच पद्धतीने आपण आजच्या काळामध्ये कोरोनाला चले जाव चा नारा दिला पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये लसीकरणाबाबत असलेला संभ्रम ही दूर केला.
प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी अध्यक्षीय भाषणातून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत माझे गाव माझी जबाबदारी म्हणून स्वच्छता ठेवावी असा संदेश दिला.आपल्या आजूबाजूच्या परिसरामधल्या घनकचऱ्याच्या विल्हेवाटा सोबतच इ- कचऱ्याचे सुद्धा व्यवस्थापनआपण केले पाहिजे. व प्रत्येकाने आपल्या गावांमधील ई-कचऱ्याचे संकलन करून त्याचे पुनरुत्पादन करण्यासाठी स्थानिक शासनाकडे जमा करावे आणि स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात स्वतःपासून करून आजूबाजूच्या परिसरामध्ये राबवावी असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले.
उपप्राचार्य डॉ. राधा सवाने यांनीही कोरोनाच्या प्रतिबंधक लसीकरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. देशाचे 50% लसीकरण झालेले असले तरी अजूनही ग्रामीण भागातील नागरीक लस घेण्यास घाबरत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लसीकरण होण्यासाठी अनेक सामाजिक संघटना जनजागृती करत असल्याचे ही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.रोटरी क्लब ऑफ वरोरा चे सचिव मा. बडुभाऊ देऊळकर यांनी महात्मा गांधीचे विचार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले . व उपस्थित सर्व मान्यवरांना ,विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना लाड यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून covid-19 संपूर्ण लसीकरण जनजागृती अभियान या कार्यक्रमा मागचा उद्देश व कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर,कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बारेकर सर,रोटरी क्लबचे पदाधिकारी मा. समीर बाराई, मा. जितेंद्र मत्ते, मा. दामोदर भासपाले, मा. प्रवीण कीटे, मा. रवी शिंदे. मा. विनोद नंदुरकर. तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका, क्रीडा विभागाचे विद्यार्थी यांच्यामुळे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सहकार्यक्रम अधिकारी डॉ. नरेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व
कु. निकिता माणुसमारे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.