मजुरी द्यायला पैसे नाही: बळीराजाने करायचे काय❓,दिवाळी आली तोंडावर मदत नाही खात्यावर

  • Post author:
  • Post category:इतर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. आश्वस्त करणारी ही मदत मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. शासनाची घोषणा झाल्याने आपल्या खात्यात पैसे आले का, म्हणून शेतकरी दररोज बँकाच्या येरझारा मारत आहे. मात्र, त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकरी वाऱ्यावर असल्यासारखी स्थिती आता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे मजुरी द्यायला पैसे नाही. यातून बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आले आहे. खुल्या बाजारात मात्र सोयाबीनचे दर पडले आहेत.

सोयाबीन, कापूस, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कोट्यवधी रुपयांचे हे नुकसान भरून निघणे अवघडच आहे. सुधारित निकषामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

१२१ कोटींचा आकडा वाढणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्वी हेक्टरी ६,८०० रुपयांची मदत दिली जात होती. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा प्रस्ताव सादर केला. आता सुधारित निकषानुसार मदतीची घोषणा झाली आहे. यात हेक्टरी १० हजार रुपये देण्याच्या सूचना आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा १२१ कोटींच्या पुढे सरकणार आहे.

मजुरांची दिवाळी, शेतकरी फिरतो दारोदारी

मजुरीचे वाढलेले अमाप दर शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे आहेत. यातून मजूरवर्ग चिंतामुक्त झाला आहे. आज ना उद्या त्यांना मजुरीचे पैसे मिळतात. त्याच सुमारास शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांचे मात्र दिवाळे निघाले आहे. वर्षभर काम करून घरात पैसा नसल्याने दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांकडे आहे.

मात्र, ही मदत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना, मदत मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. यासाठी कुठले शेतकरी पात्र आहेत. याची यादी बँकांमध्ये लागणार आहे.