
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
केळापुर तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी वाढली आहे. आधी मध्यरात्री करण्यात येणारी जनावर तस्करी आता दिवसा सुध्दा सुरु करण्यात आली आहे. पांढरकवडा पो स्टे मधील काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे जनावर तस्करांशी आर्थीक सुत जुळल्यानेच जनावर तस्करी दिवसा सुध्दा सुरु करण्यात आल्याचा आरोप गो-प्रेमीतुन करण्यात येत आहे.
जनावर तस्करीत पोलीसांचा असलेला सहभाग याआधी सुध्दा उघडकीस आलेला आहे. पाटणबोरी आउट मधिल काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनावर तस्करीला आपले आर्थीक स्तोत्र वाढविण्याचा नवा धंदा बनविल्याचे बोलल्या जात आहे. खास करुन मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशातील जनावर तस्करांशी सलगी करून पाटणबोरी आउट पोस्टच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री होणारी तस्करी आता दिवसा सुध्दा सुरु केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशीच दिवसा सुरु असलेली जनावर तस्करी ३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या पथकाने उघडकीस आणली आहे.
३ रोजी दुपारी १.३० वाजता दरम्यान पांढरकवडा येथील टोल टॅक्सजवळ डी वाय एस पी यांच्या पथकाने जनावरांचा एक कंटेनर पकडुन त्यातील सुमारे ४९ जणावरांची सुटका केली होती. शिवाय त्यात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील एक आरोपी विधीसंघर्ष बालक सुध्दा आहे. हि कार्यवाही जेव्हा करण्यात आली त्यावेळी जनावरांची वाहतुक करीत असलेल्या चालक व वाहकाने कंटेनर तेलंगणामध्ये पास करून देणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे घेतल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे. त्यातील एकाचे नाव संदिप असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. ज्या तिन पोलीस कर्मचाऱ्यांचे तस्करांनी नाव घेतले त्यातील एक पोलीस कर्मचारी पांढरकवडा पो स्टे मध्ये कार्यरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खोलवर तपास होणे गरजेचे झाले आहे. तसेच तो पो कर्मचारी कोणत्या अधिकाऱ्याच्या ईशान्यवर जनावरांचे वाहन तेलंगणात पास करतो, याचाही छडा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लावण्याची गरज आहे. कारण जनावर तस्करीत गुंतलेल्या पांढरकवडा पो स्टे मधील एक, दोन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे संपुर्ण पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदनामी होत आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे व जनावर मालकांचे मोबाईल कॉल डिटेल्स काढुन दोषीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी आता पोलीसच दबक्या आवाजात करु लागले आहे.
