पोटच्या गोळ्याला जन्म देऊन आईचे पलायन,यवतमाळ येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ रुग्णालयात प्रसुती होऊन बालिकेला जन्म दिलेल्या आईने अचानक रुग्णालयातून पलायन केले. मात्र त्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही मन हेलावून टाकणारी घटना जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून पोलिसांनी त्या बालिकेच्या आई-वडिलांची शोधमोहीम सुरू केली आहे.पोलिस सूत्रांनुसार, वाशीम जिल्ह्यातील बोरव्हा येथील महिला प्रसुतीसाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली होती. 16 नोव्हेंबरला त्या महिलेची प्रसुती झाली असून तिने बालिकेला जन्म दिला. बालिकेची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिला वॉर्ड क‘मांक 11 मध्ये दाखल केले. मात्र, कुणालाही न सांगता त्या महिलेेने बालिकेला सोडून परस्पर रुग्णालयातून पलायन केले. दरम्यान, मंगळवार, 23 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता उपचारादरम्यान त्या बालिकेचा मृत्यू झाला.या प्रकरणी डॉ. स्मृती विरघन यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून, पोलिसांनी त्या बालिकेच्या आई-वडिलांची शोधमोहीम सुरू केली. पुढील तपास ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.