
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान शासनाने वेतनवाढ करुनही कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे आंदोलनाच्या २५ व्या दिवशी गुरूवार, दि. २ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील १० जणांचे निलंबन करण्यात आले आहेत. यापूर्वीही २९१ जणांचे निलंबन केले आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करुन घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची काम बंद आंदोलन सुरु केले आहेत. या कालावधीत अनेकांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर महामंडळाचेही कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. यामुळे शासनाने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात साडेसात हजार रुपयांची वाढ केली आहे.
परिणामी आंदोलन बंद होऊन कामगार परत येणार अशी इच्छा कर्मचाऱ्यांची होती. मात्र, यानंतर उलट आंदोलन अधिक हिंसक झाले आहे. कारण त्यानंतर सुरु झालेल्या बसेस वर दगडफेक करण्याचेही प्रकार घडले. त्यामुळे राज्य शासनाने कठोर पाऊल उचलून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची कारवाई करण्यात आली आहे. आता पर्यंत जिल्ह्यातील ३०१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. यात अधिक वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. शासकीय सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी बहुतांश कर्मचारी अद्याप आंदोलनावर ठाम आहेत. बुधवार, दि. १ डिसेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सोबत घेवून आक्रोश आंदोलन करण्यात आले होते..
