
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
गेल्या काही महिन्यांपासून रखडुन पडलेल्या रेती घाटांच्या लिलावाला अखेर मुहुर्त मिळाला आहे. यासंदर्भात आवश्यक असलेली संपुर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ३४ रेती घाटांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी लिलाव करण्यात आलेल्या रेती घाटांची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत होती. मात्र नव्या निर्देशानुसार पावसाळ्यात जुन महिन्यात रेती उपसा बंद झाल्यानंतर पुन्हा रेती उपसा करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे गेल्यावर्षी रेती घाट घेणाऱ्या अनेक व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागला होता. रेतीघाटांची मुदत संपूनही नव्या रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडुन पडली होती. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानगी आणि प्रस्ताव तयार करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाने सुरूवात केली होती. या सर्व परवानगी काही दिवसांपूर्वी प्राप्त झाल्याने जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ३४ रेती घाटांचा ई-लिलाव करण्याची प्रक्रीया सुरू केली. त्यात शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी हा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात या सर्व ३४ रेतीघाटांसाठी सुमारे ३४ कोटी रुपयांची किंमत शासनाने आखून दिली आहे. हा लिलाव बोली पद्धतीने होणार असल्याने सर्वोच्च बोली बोलणाऱ्या व्यावसायिकांना रेती घाट देण्यात येणार आहे.
रेतीच्या शासकीय दरात वाढ
शासनाच्या वतीने आखून देण्यात आलेल्या नियमानुसार ठरवून देण्यात आलेल्या रेतीच्या प्रति ब्रास शासकीय किमतीमध्ये दरवर्षी ६ टक्के वाढ करण्यात येते. त्यानुसार गेल्यावर्षी शासनाने ठरवून दिलेल्या २५९४ रुपये प्रति ब्रास रेती साठ्याच्या किमतीमध्ये यंदाही ६ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा रेतीची प्रति ब्रास शासकीय किम्मत ही २७५० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
