
मुलगा असो वा मुलगी; २१ व्या वर्षीच लागणार हळद, उडणार लग्नाचा बार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
देशात महिलांसाठी विवाहाचे वय किमान १८ वर्षे, तर पुरुषांसाठी २१ वर्षे होते. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाने महिलांचे लग्नाचे वय १८वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुलगा असो अथवा मुलगी दोघांनाही २१व्या वर्षांनंतरच आता हळद लागणार आहे. केंद्रीय महिला टास्क फोर्स आणि बालविकास मंत्रालयाच्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. सरकारकडून उर्वरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याला कायदेशीर मान्यता मिळेल. वयोमर्यादा वाढविल्यानंतर लवकर लग्न करण्यासाठी बळी पडणाऱ्या मुलींना दिलासा मिळेल.
लग्नाचे वर्षे १८ असल्याने अनेक कुटुंबात मुलीचे लग्न लवकर उरकले जात होते. परिणामी अनेक अभ्यासू हुशार मुलींना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विशेषतः ग्रामीण भागात मुलींना लवकर लग्नासाठी आग्रह केला जात होता. आता हे वय २१ वर्षे केल्याने मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सुटणार नाही.
