
विद्यार्थ्यांसह पालक- महिलांची गर्दी जमवित घेतला कार्यक्रम …
नियमांचे उल्लंघन करणा-या विरूध्द कारवाई करणार – सभापती संजय पिंपळशेंडे
वणीः- नितेश ताजणे
पंचायत समिती अंतर्गत येणा-या मानकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने, कोविड आजाराचा प्रसार होवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करीत शाळेत भरगच्च गर्दी जमवित कार्यकम घेण्यात आला आहे. परिणामी चक्क मुख्याध्यापकांनी कोविड सारख्या थैमान घालणा-या आजाराच्या पार्श्वभूमिवर कार्यक्रमाचे आयोजन केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार तालूक्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांमध्ये शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक ह्यांचेकडून कोविड अनुरूप नियमावलींचे पालन केले जावे याबाबत सुचना व नियमावली सर्व शाळांना देण्यात आली आहे. सोबतच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सुचना ही देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार मर्यादित संख्येमध्ये विद्यार्थ्यांना बोलाविणे? वेगवेगळ्या तुकड्या करून बोलाविणे, शाळेत एकत्रीत जमण्याचे सर्व कार्यक्रम जसे खेळ, परिपाठ, सांस्कृतिक कार्यक्रम बंद करणे, कोविड अनुरूप नियमावलींचे पालन करणे सोबतच आवश्यक सुचनांचे पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दि.५ जानेवारीला एका आदेशाद्वारे शिक्षणाधिकारी यांना दिल्या होत्या. त्यावरून पंचायत समिती स्तरावरून संबधीत सुचना प्रत्येक शाळांतील मुख्याध्यापकांना देण्यात आल्या होत्या.
कोविड आजाराच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळांमध्ये सुचनाचे पालन करण्याचे पत्र देवून सुध्दा जिल्हा परिषद शाळा मानकी येथील मुख्याध्यापकाने गर्दी जमवून महिलांसाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गावातील महीला, विद्यार्थी, शिक्षक आणि इतर पाहूण्यांनी सुध्दा सहभाग घेतला होता. भरगच्च गर्दी त्यात कोणत्याही नियमांचे पालन नाही, मास्क सॅनिटायझर चा वापर सुध्दा करण्यात आला नाही. एकीकडे शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी देत आहेत. आणि त्या सुचनांना हरताळ फासत येथील मुख्याध्यापक कोविड काळात कार्यक्रम आयोजित करीत असल्याचे बघायला मिळाले आहे. साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असतांना मानकी शाळेने चक्क जिल्हाधिका-यांनी दिलेल्या सुचनाचे जणू उल्लंघनच केल्याचा प्रकार बघायला मिळाला आहे. शाळेंमध्ये विद्यार्थी व महिलांची भरगच्च गर्दी जमवून कार्यक्रमाचे आयोजन करणा-या विरूध्द कोणती कारवाई होते. याकडे लक्ष लागले आहे. याबाबत पंचायत समिती शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सदर कार्यक्रम घेणे चुकीचे आहे. शासनाचे आदेश असतांना असे कार्यक्रम घेणा-यावर शासन नियमानुसार कारवाई अपेक्षीत आहे असे त्यांनी सांगितले आहे. व वरिष्ठांनी दिलेल्या सुचना मुख्याध्यापकांना दिल्याचे ही सांगीतले आहे. एकूणच वरिष्ठांच्या आणि शासनांच्या सुचनेला बगल देत मानकी येथील जिल्हा परिषद शाळेत कोविड नियमांचे पालन न करता भरगच्च कार्यक्रमाचे आयोेेेजन करण्यात आल्याने संबधीत शाळेविरूध्द कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
नियमांचे उल्लंघन करणा-या विरूध्द कारवाई करणार
कोविड साथरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकार्यांनी खेळ, सांस्कृतीक कार्यक्रम, किंवा गर्दीचे कार्यक्रम टाळावे यासाठी सर्व शिक्षणाधिकार्यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरुन पंचायत समिती स्तरावरून संबधीत सुचना प्रत्येक शाळातील मुख्याध्यापकांना देण्यात आल्या होत्या. तरीसुध्दा कांही शाळेत कार्यक्रम घेतांना दिसुन येत आहे त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-या विरूध्द कारवाई करणार आहे.
संजय पिंपळशेंडे, सभापती
पंचायत समिती वणी
