राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पडताळणी करिता केंद्रप्रमुख हे महत्त्वाचे पद आहे मात्र राळेगाव तालुक्यातील १० केंद्रांपैकी ८ केंद्रप्रमुखाची पदे रिक्त असून या ८ रिक्त पदावर शिक्षकच अतिरिक्त केंद्रप्रमुख म्हणून काम पाहत आहे. या प्रकारामुळे तालुक्यात एकाच विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी आणि गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे तालुक्यात कायमस्वरूपी केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शालेय स्तरावर विद्यार्थी व शिक्षकांचे वारंवार मूल्यमापन करून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र प्रमुखांची पदे शासनाने निर्माण केली आहेत.राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदच्या एकूण शाळा ११७ असून यामध्ये वर्ग १ ते ४ च्या शाळा ७९ तर वर्ग १ ते ७ च्या शाळा ३८ तर खाजगी शाळा ४५ व जिल्हा परिषद हायस्कुल २ अशा एकूण १६४ शाळा असून जिल्हापरिषदच्या वर्ग १ ते ७ या ११७ वर्गात एकूण ६८३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर खाजगी शाळा ४५ व जिल्हापरिषद हायस्कुल २ या मध्ये ११४०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राळेगाव तालुक्यातील जळका, झाडगाव, राळेगाव, अंतरगाव, धानोरा, वडकी, वाढोना बाजार, वरध, खैरी, सावरखेडा, असे एकूण दहा केंद्र असून दहा केंद्रापैकी वैकुंठ मो.घुगरे, व चंद्रभान की.शेळके हे दोन केंद्रप्रमुख कार्यरत आहेत तर सहाय्यक केंद्रप्रमुख म्हणून मनीष प्र.नागतोडे यांच्याकडे राळेगांव, लक्ष्मण पु.ठाकरे अंतरगाव,विजय दा.दुर्गे धानोरा ,पुरुषोत्तम वि वटाने वडकी, दीपक प्र.करपते वाढोना बाजार,सुरेश वा. कुंभलकर खैरी , हरिदास म. वैरागडे वरध, भगवान डो. बोरपे सावरखेडा अशा एकूण आठ केंद्रावर शिक्षकांना केंद्रप्रमुखाचा पदभार देण्यात आला आहे तालुक्यातील काही शाळेतील दुबार नोंदणी या संदर्भात मुख्याध्यापकांशी चर्चा केली असता जून महिन्यात जिल्हा परिषद शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्याची आधार पडताळणी करत असताना संबंधित विद्यार्थी इतर शाळेचे दाखल असल्याचे चर्चेअंती समोर आले आहे.
तसेच तालुक्यातील अतिरिक्त केंद्रप्रमुख पदावर काम करणारे शिक्षकांकडून नियमाचे पालन होत नसल्याची बाब समोर येत आहे यामध्ये केंद्रप्रमुख यांचेकडून अध्ययन क्षमता संपादणूक पातळी उंचावण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष उपक्रम घेतले जात नाहीत याशिवाय वार्षिक शालेय नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे दृकश्राव्य शैक्षणिक साधने या बाबत कुठेही कार्यशाळेचे आयोजन होत नाही केंद्रातील शाळांना पूरक व पर्यायी शिक्षण तपासणी प्रतवारी निश्चित करणे मुख्याध्यापक शिक्षक यांच्या अध्ययन कामाचा आढावा घेणे स्नेहसंमेलन आयोजित करणे अशा विविध शैक्षणिक कर्तव्यात शिवाय शैक्षणिक बाबीचे संबंधित सर्व प्रकारच्या कामकाजाचे आयोजन नियोजन अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडणे हे केंद्र प्रमुखाचे काम आहे परंतु प्रभारी केंद्रप्रमुख पदावरील शिक्षक अनुभवी नसल्याने ते प्रभावी काम करू शकत नसल्याचे सत्य समोर येत आहे त्यामुळे सर्वकष पद्धतीने सुसूत्रता येऊन शैक्षणिक गुणवत्ता आलेख उंचावण्यासाठी शिक्षक विभागाने केंद्र प्रमुखाची रिक्त पदे तातडीने भरावे अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे. तसेच पंचायत समिती स्तरावरील पर्यवेक्षीय यंत्रणेच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या त्या पर्यवेक्षीय यंत्रणा गुणवत्ता विकास तथा प्रशासकीय बाबी पूर्ण करण्याकरिता नियुक्त करण्यात आल्या परंतु या यंत्रणेचा खरोखरच वापर गुणवत्ता विकास वाढीसाठी होतो का पर्यवेक्षकीय यंत्रणा शाळेत भेटी देऊन शिक्षकाच्या शैक्षणिक समस्येचे निराकरण करतात का की परस्पर दौरा दाखवून वेळ काढून तर नेत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे आजचे युग विज्ञानाचे युग असतांना एकच माहिती वारंवार मागितले जात असल्याने हे अभियानाचे दुर्भाग्य की काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहे त्यामुळेच अभियान हे समग्र शिक्षा अभियान यशस्वी ठरणार का ? तर गुणवत्ता विकास वाढीसाठी केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी साधनव्यक्ती यांची नियुक्ती गुणवत्तावाढीसाठी करण्यात आली परंतु याचा वापर होतो की नाही हे कार्यालयात येऊन स्वाक्षरी करून आपल्या वैयक्तिक कामाकडे जात तर नाही ना जर जात असतील तर विभाग प्रमुखाचे कार्यालय प्रमुखावर कितपत लक्ष आहे यावरून दिसून येत आहे
त्यामुळे या सर्व बाबीकडे वेळीच लक्ष देवून रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावी अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात आली आहे.
बॉक्स
शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड न पडता शालेय उपक्रम तथा माहिती घेण्यात यावी याकरिता तालुकास्तरावर सहाय्यक केंद्रप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे
गटशिक्षण अधिकारी
शेख लुखमान
पंचायत समिती राळेगाव
