
पोंभुर्णा/१६ फेब्रुवारी.
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी उपवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५४६ मध्ये वृक्षारोपण करण्याच्या नावाखाली वनविभागाने हजारो झाडांची कत्तल केली असून या प्रकरणी दोषी वनअधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वन्यजीव पशुपक्षी प्रेमी अविनाश वाळके व शिवसेना तालुका समन्वयक विजय वासेकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी उपवनक्षेत्रात वृक्षारोपण च्या नावाखाली ६० हेक्टर मध्ये डौलाने उभे असलेले जंगल वन अधिकारी यांच्या स्वार्थासाठी ट्रॅक्टर लाऊन उध्वस्त केले. यात मोठमोठ्या झाडांना जमिनदोस्त करुन वनविभागाने आपला स्वार्थ साधुन घेतला.त्या जंगलात वन्यजीव मोठ्या गुण्यागोविंदाने नांदत होती पण हे जंगल नष्ट झाल्याने त्यांच्यावर आता भटकंती करण्याची पाळी आली आहे.याच जंगलात एक वाघीण आपल्या बछड्यांसह वास्तव्याने राहत होती ति कुठे गेली यांचाही शोध घेणेही गरजेचे झाले आहे.या उध्वस्त झालेल्या जंगलांची आपल्या स्तरावरून योग्य ति चौकशी करून दोषी वनअधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोंभुर्णा तालुका वनवैभवाने नटलेला आहे,शिवाय या तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणावर आहे.जंगलात विविध प्रकारच्या प्राण्यांचे वास्तव्य असल्याने पर्यटकांना तालुक्याचे आकर्षण आहे.हमखास वाघ बघायच्या निमित्ताने जंगल सफारी करायला पोंभुर्णा तालुक्यात दुरदुरचे पर्यटक भेट देतात. अशातच घोसरी येथील संरक्षीत जंगलाला वनविभागानेच उध्वस्त केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
झाडे लावा, झाडे जगवा या शासनाच्या धोरणाला फाटा देत पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील संरक्षीत जंगलात झाडाची कत्तल करण्यात आली.
