

वरोरा – तालुक्यातील आकोला या गावात मागील ४० वर्षापासून बस सेवा सुरू होती. मात्र येथील रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्यामुळे मागील सात महिन्यापासून बससेवा बंद आहे. आकोला या गावाला बस वाकोल्या दाखवत गिरोला-माकोना निघून जाते. रस्त्याच्या दुरुस्तीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ही पाळी आली आहे. याचा फटका आकोला गावातील ज्येष्ठ नागरिक, सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना बसला आहे.
वरोरा तालुक्यातील आकोला हे पुनर्वसित गाव आहे. या गावात मागील ४० वर्षापासून बस जात होती. पुढे ती माकोना या गावापर्यंत वाढविण्यात आली. परंतु रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे मागील सात महिन्यापासून बस बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशांचे बेहाल होत आहे. पारडी-आकोला-गिरोला या रोडवर खड्डे पडलेले आहेत. गिट्टी उखडली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर खड्ड्याचा अंदाज घेता न आल्याने अनेक छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत.
बांधकाम विभाग व शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पारडी-अकोला-गिरोला या तीन किलोमीटर मार्गाची मागील एक-दिड वर्षापासून दयनीय अवस्था आहे. पण बांधकाम विभागाने याकडे अद्यापही लक्ष दिले नाही.
आकोला या गावात ७० वर्षावरील २० ते २५ ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना नेहमी आरोग्याच्या समस्या उद्भवतात. आरोग्य सेवेसाठी त्यांना शेगाव गाठावे लागते. शेगावला जाण्याकरिता सकाळची बस पकडण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करत पारडी येथे जाऊन बस पकडावी लागते. कधी कधी बसही निघून जाते. आणि आल्यापावली परत यावे लागते. आकोला या गावातील अनेक विद्यार्थी शेगावला शिक्षणाकरिता जातात. त्यांची सुद्धा तिच अवस्था आहे. संध्याकाळी परत जाताना ठोकरा मारत गावाला परत यावे लागते. यात अनेकदा ज्येष्ठ नागरिक खाली पडलेले आहेत. या संदर्भात अनेकदा व्यथाही मांडलेल्या आहेत. पण याची दखल अद्याप कोणीही घेतलेली नाही.
आमची गंभीर समस्या लक्षात घेता वरोरा आगाराने पारडी येथून अकोला येथील प्रवासी ने-आण करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अकोला येथील ज्येष्ठ नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.
अरुण उमरे
