
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या लोकसह्भागातून कृषी व उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत व दिलासा संस्था, घाटंजी मार्फत झरी तालुक्यातील कारेगाव (पारंबा), कारेगाव (गोंड), मजरा, मुळगव्हाण, टेंभी राजनी, पाचपोर, शिराटोकी, पांढरवणी, बोटोनी व पार्डी, चिचपोड व अंबेझरी व राळेंगाव तालुक्यातील लोहारा, एकलारा, कृष्णापूर, श्रीरामपूर, शिवरा, मांडवा, पिंपरी दुर्ग, सोयटी, कोपरी, इंझापूर वालधुर, चिकना व दापोरी अशा एकूण २६ गावांची निवड केली असून, प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरावर संयुक्त महिला समितीच्या माध्यमातून प्रकल्पातील विकास कामे करण्यासाठी ग्रामसभेतून संयुक्त महिला समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून उपजीविका उपक्रम अंतर्गत कृषी अवजार बँक, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय (डेअरी), शेळीच्या जाती सुधार करण्यासाठी जातिवंत बोकड, स्थानिक पातळीवर वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी पशु सखी , वनउपज संकलन करणाऱ्या गटाला प्रोत्साहन देणे व मत्स्यपालन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे संयुक्त महिला समितीची क्षमता बांधणी करणे, प्रकल्प ओळख व त्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत माहिती देण्यासाठी दिलासा संस्था अंतर्गत राळेगाव क्लस्टरचे दि. १६ फेब्रुवारी २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२२ व झरी क्लस्टरमधील दि. ११ मार्च २०२२ ते दि. १३ मार्च २०२२ या कालावधीमध्ये अशा एकूण २६ गावातील संयुक्त महिला समिती सदस्याचे प्रशिक्षण दिलासा ट्रेनिंग सेंटर, चोरंबा घाटंजी येथे आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाला एकूण ३१६ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
दिलासा संस्थेचे संस्थापक स्व. मधुकरभाऊ धस व बजाजचे संस्थापक स्व. राहुलजी बजाज यांच्या फोटोचे पूजन करून प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. श्री. बालाजी कदम व श्री. पवन नखाते यांनी उपस्थितांचे व साधन व्यक्तींचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री. किशोरभाऊ पंधरे (सचिव, दिलासा) यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रशिक्षणास प्रमुख पाहुणे म्हणून विजयाताई धस (अध्यक्ष, दिलासा), श्री. मन्सूर खोराशी (कार्यक्रम संचालक), श्री. सुभाष मानकर ( फायनन्स डायरेक्टर) उपस्थित होते. तर साधन व्यक्ती म्हणून श्री. पराग काळे व श्री. प्रशांत देवळे यांनी महिला समितीला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन व आभार प्रदर्शन श्री. प्रशांत धनोकार ( प्रकल्प समन्वयक) यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलासा संस्थेचे कार्यकर्ते आशिष रामगिरवार, पुरुषोत्तम राठोड, शितल ठाकरे व भाग्यश्री पाटील यांनी मदत केली.
