
महसूल विभागाकडून साडे सहा लाखांचा दंड
सध्या जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू असल्याने दिग्रस महसूल विभागाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कंबर कसली आहे. गेल्या दोन दिवसात दिग्रस महसूल विभागाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा बडगा उगारल्याने दिग्रस तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील तिवरी-आमला या मार्गावर वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार सुधाकर राठोड यांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी पी.आर.जाधव, मंडळ अधिकारी आर.पी.काळे,बाळू इंगोले, गजानन चौधरी, कोतवाल सुधीर चव्हाण, कोतवाल मात्रे, यांनी दि.२४ मार्च च्या पहाटेपासूनच पहारा ठेवला. दरम्यान ७.१५ वाजताच्या दरम्यान ट्रक क्रं. एम.एच.४० व्हाय.३६१० हा पकडला. तो ट्रक तहसीलदारांनी दिग्रस पोलीस ठाण्यात लावला. त्यानंतर ८.१४ वाजताच्या दरम्यान ऑनलाइनद्वारे रॉयल्टी तपासणी केली असता सदर ट्रकची पावती वैध असल्याचे आढळून आले. मात्र त्या ट्रक मध्ये वाळू क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे वाटल्याने महसुल प्रशासनाने ट्रक ची तपासणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तपासणीत ट्रक मध्ये १.९९ ब्रास वाळू असल्याचे आढळून आल्याने त्यावर कारवाई न करता त्या टिप्परला सोडण्यात आले. याच दरम्यान एक ट्रॅक्टर क्रं. एम.एच.२९ आर.९८६९ महसूल प्रशासनाने पकडला. अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने त्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली व १ लाख ९ हजार ५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यानंतर पुन्हा सोमवारी दि.२८ मार्च च्या मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान तालुक्यातील तुपटाकळी जवळ एम.एच. २९ टी.१७२८ व एम.एच.३२ क्यू.३१३० या क्रमांकाचे दोन टिप्पर अवैधरित्या वाळू वाहतूक करतांना आढळून आले. त्या २ टिप्परला तहसीलदार सुधाकर राठोड यांनी अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कारवाई करत प्रत्येकी २ लाख ७३ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.असा एकूण ६ लाख ५५ हजार ४५० रुपयाची कारवाई महसूल प्रशासनाने केली आहे. दिग्रस तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाकडून कारवाई सुरू असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
