
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल रोजी “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पंतप्रधानांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देत परीक्षेमुळे येणारा ताण आपली स्वप्ने पालकांना कशी समजावून सांगावीत याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. विद्यार्थी व पालक दोघांनाही भवितव्याच्या चिंतेने ग्रासले असून पंतप्रधान मोदी मात्र त्यांना कोरडे सल्ले देण्याचे काम करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीला वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ अस आश्वासन दिलं होतं, मात्र, मोदीजी निवडून आल्यानंतर ते त्यांचं वचन कदाचित विसरले आहेत. नेहमीप्रमाणे मोदीजींनी शिक्षणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. देशातील बेरोजगारीकडे दुर्लक्ष करणं हे सुशिक्षित तरुणांसाठी घातक आहे. हे पंतप्रधान मोदीजींना कोणीतरी सांगायला हवं.
सद्यस्थितीत देशातील बेरोजगारी वाढण्यामागे कोरोना विषाणू हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. मात्र, संकट कुठलेही असो संकटाचा सर्वाधिक फटका बसतो तो समाजातील दुर्बल घटकांना. कोरोनाचे आर्थिक परिणाम बघितले असता सर्वाधिक फटका हा समाजातील दुर्बल घटकांना बसलेला दिसतो. अनेकांचे रोजगार गेले, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुर्व सुचना न देता कामावरून काढून टाकले. लॉकडाऊनच्या परिणामाने जवळपास ७० टक्के लोकांचे रोजगार गेल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. अर्थव्यवस्था संथ गतीने उभारी घेत असली तरी लॉकडाऊन संपल्यानंतर देखील २५ टक्के लोक अद्यापही बेरोजगार आहेत.
शिक्षण, आरोग्य, रोजगाराची व्यवस्था त्याप्रमाणात वाढत नाही. त्याचे भयानक दुष्परिणाम येत्या काही वर्षातच भोगावे लागणार आहे. देशात भ्रष्ट सत्ताधाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे बेरोजगारांची, बेकारीची, निरक्षरांची आणि गरीबीची संख्या सतत वाढत आहे. भारताच्या घटनेचत १४ वर्षापर्यंत वयाच्या मुलामुलींसाठी सक्तीच्या शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. हे उद्दिष्ट १९६० पर्यंत गाठायचे होते. परंतु ते आजपर्यंत गाठता आले नाही. यावरून शेतकरी, कष्टकरी तरुण अडाणी ठेवण्याचा राष्ट्रद्रोही हेतू ज्यांच्या मनात आहे त्यांच्याच हातात या देशाची सत्ता आहे हे सिद्ध होते.
ज्यांच्यासाठी सगळ्या विलासयोजना आहेत, तो देशाचा भावी नागरिकच अशिक्षित, दुर्लक्षीत,अडाणी,अंध: श्रध्दाळू,अशक्त आणि रोगमुक्त आहे, हे सगळे घडण्याचे कारण, या देशाचे शासनकर्तेच येथील तरुणांचे शत्रू आहेत. त्यांनी देशाचे हे भावी आधार खिळखिळे बनवून टाकलेत. जे स्वतः उत्तम नागरिक नाहीत, ते देशाचे उत्तम नागरिक कसे निर्माण करणार? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले यांनी उपस्थित केला आहे.
