ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यत अभ्यास केंद्राची माहिती पोहचवा – आयुक्त नितीन पाटील (भा.प्र.से)

जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्राचे मानव विकास आयुक्ताकडून कौतुक

मानव विकास आयुक्तालयाकडून पाहणी व तपासणी

तालुका प्रतिनिधी/९ एप्रिल
काटोल – मानव विकास कार्यक्रम व विदर्भ विकास मंडळ अंतर्गत जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे नुकतेच मानव विकास आयुक्तालय , औरंगाबादचे आयुक्त नितिन पाटील (भा.प्र.से) यांनी भेट देऊन अभ्यास केंद्राची पाहणी करून केंद्राचे कौतुक केले.
माजी गृहमंत्री तथा आमदार अनिलबाबू देशमुख यांच्या पुढाकाराने व जि.प.सदस्य सलील देशमुख व माजी जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील तालुकास्तरावरील पहिले स्पर्धा परीक्षा केंद्र काटोल येथे उभारण्यात आले.
यावेळी मानव विकास आयुक्त नितीन पाटील (भा.प्र.से), सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर खडतकर, संशोधन सहायक, जिल्हा नियोजन समिती कमलाकर गावनेर, जि.प.नागपूर कार्यकारी अभियंता राकेश वाघमारे, गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी , आयुक्त नितीन पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यत स्पर्धा परीक्षा केंद्राची माहिती पोहचवा.विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना दिव्यांग, अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.बाहेर गावाच्या विद्यार्थ्यांना निवासी राहण्याकरिता वस्तीगृह बांधण्यासाठी प्रयत्न करा.अभ्यास केंद्रात असलेली भौतिक सुविधा, पुस्तक संख्या, राबविण्यात येणार उपक्रम याबाबत कौतुक केले.
अभ्यास केंद्राची माहिती केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया तर उपक्रम माहिती केंद्र समन्वयक राजेंद्र टेकाडे यांनी मानव विकास टीमला दिली.