
यवतमाळ : आरोग्य सुविधा अद्याप समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचली नाही. अद्यापही आरोग्य व्यवस्थेच्या अभावाने आदिवासी समाज पारंपरिक पद्धतीने उपचार करीत असतात. परंतु टच फाउंडेशन ग्रामविकास केंद्र मारेगाव तालुक्यातील रोहपट येथील ‘जीवनज्योती’ रुग्णालय या भागातील आदिवासी समाजाच्या जीवनात संजीवनी ठरेल असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
मारेगाव तालुक्यातील रोहपट येथील टच फाउंडेशन ग्रामविकास केंद्राच्या माध्यमातून जीवनज्योती रुग्णालय उभारण्यात आले. आज खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते या रुग्णालयाचे रीतसर उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार वामनराव कासावार, डॉ. शामराज जी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विजय नळे, मारोती गौरकार, डॉ. पॉलजी, युवा काँग्रेस नेते रमण डोहे, दिलीप सेंगरपाली यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, आदिवासी समाजासाठी मी नेहमी त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतीय सैनिकात आदिवासी रेजिमेंट नव्याने स्थापन करून मोठ्या प्रमाणात आदिवासी युवकांना सैन्यात येण्यासाठी प्रोत्साहन कारण्याच्या लोकहितकारी प्रश्न संसदेत लावून धरला. येत्या काळात हा प्रश्न निकाली काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असून आदिवासी समाजाचे प्रश्न हे माझे प्रश्न आहे. याकरिता राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
