
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० प्रकल्पांतर्गत राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विद्युत वाहिन्यांचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना सुरक्षा नियमांना हरताळ फासण्यात येत असून अनेक ठिकाणी ११ केव्ही विद्युत वाहिन्या व खांब थेट रस्त्यालगत व रस्त्यावरच उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यातील कोपरी, अंतरगाव, चिखली, धानोरा, आपटी निधा, वाठोडा व रानवड या गावांमधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खोदकाम करून विद्युत खांब टाकण्यात आले असून रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी माती, सिमेंटचे खांब व लोखंडी साहित्य रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विशेषतः शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार व वृद्ध नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी कोणतेही सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा संरक्षक व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. ग्रामस्थांनी याबाबत संबंधित ठेकेदार व महावितरणकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
काम करताना नियमांचे पालन न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सदर काम तात्काळ सुरक्षित पद्धतीने पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
