
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, माजी विद्यार्थी संघटना कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव व राष्ट्रीय युवा संघठन च्या संयुक्त विद्यमाने पिंपळखुटी येथे बालसंस्कार केंद्राची स्थापना करण्यात आली. रासेयो द्वारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महाविद्यालयाच्या पिंपळखुटी गावातील विद्यार्थिनी कु. दर्शना मरसकोल्हे व कु. प्राची मोहिते यांच्या संचालनात नवीन वस्ती परिसरात लहान मुलांना घेऊन केंद्राची सुरुवात झाली. या केंद्राच्या माध्यमातून मुलांना खेळ, शिक्षण, स्वास्थ, समाजसेवा, कलागुण, प्रार्थना, ध्यानधारणा व योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल दौलतकर यांनी बालसंस्कार केंद्र हे एक परिवार असून, याद्वारे ग्रामीण भागातील मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे विनोद दादा देवतळे यांनी जातीपातीचा व आर्थिक भेदभाव न करता मुलांना संस्कारित करणे हेच संस्कार केंद्राचे ध्येय असल्याचे सांगितले.
या प्रसंगी प्रा. पंकज आत्राम उपस्थित होते. विद्यार्थी प्रमुख सुहानी कुमरे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर, प्राची मोहीते हिने आभार व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ‘खरा तो एकची धर्म’ ही सामुहीक प्रार्थना पठन केली. पिंपळखुटी गावातील लाहान मुले-मली व महाविद्यालयातील रासेयो विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपरिक वेशभूषेत छोटेखानी गावात रॅली काढली.
या उपक्रमाचे कौतुक करत महाविद्यालयाची मातृसंस्था ऑर्किड्स एज्युकेशन सोसायटी नागपूरचे अध्यक्ष डॉ. भाऊ दायदार, सचिव विलासराव भोयर व कोषाध्यक्ष नितीनजी सरदार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
