
प्रतिनिधी: चेतन एस. चौधरी
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्या नंतर रिक्त झालेल्या गट व गणांसाठी ही निवडणूक होत आहे.
१५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. २१ सप्टेंबर रोजी छाननी होईल.
५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करतांना
श्री. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-19 मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका ९ जुलै २०२१ रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या.
