
चंद्रपूर: मुलांना चांगले संस्कार देण्याचे काम प्रत्येक पालक करीत असतात. मुलांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पालकांकडून मिळालेले संस्कार उपयोगी ठरत असते. परंतु, गावातील चिमुकले चक्क स्वयंस्फूर्तीने वेगवेगळे उपक्रम राबवित गावकऱ्यांनाच आदर्शाचे धडे देत आहेत. हे आगळेवेगळे उपक्रम राबविणारे चिमुकले राजुरा तालुक्यातील वरूर रोड या गावातील आहे. चिमुकल्यांच्या या उपक्रमांचे शासकीय अधिकान्यांसह गावपुढाऱ्यांनी अनेकदा कौतुक केले आहे.
वरूर रोड गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. तेथे चवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्यानंतर गावात खासगी शाळा असून तिथे बारावीपर्यंतच्या
शिक्षणाची सुविधा आहे.
गावखेड्यातील विद्यार्थी शाळेच्या वेळेव्यतिरिक्तचा अन्य वेळ खेळण्यात घालवित होते. या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, फावला वेळ त्यांचा सत्कार्मी लागावा, अशी गावातील काही शिक्षित युवकांना वाटू लागले. त्यानंतर काय उपक्रम सुरू करावा, यावर विचारमंथन झाले. त्यानंतर गावात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु वाचनालय नेमके कुठे सुरू करायचे असा प्रश्न उपस्थित झाला.
त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या
आवारात अनेक वर्षापासून कुलूपबंद
असलेले गोदाम होते. या गोदामात वाचनालय सुरू करण्यावर सर्वांचे एकमत झाले. गावातील युवकांनी गोदामाच्या खोलीची स्वच्छता केली. भिंतीची रंगरंगोटी केली. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने वीजेची सुविधा करून दिली. गावातील दानशूर नागरिकांच्या मदतीने पंखे मिळविले. वर्गणीतून प्राप्त झालेल्या रकमेतून स्पर्धा परीक्षेची पुस्तके खरेदी केली. सुरुवातीला दहा मुले अभ्यासाला येऊ लागली. बघता बघता विद्यार्थ्यांचा आकडा ४० पर्यंत पोहोचला. यात नर्सरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना वाचनासोबत अन्य विषयातील ज्ञान मिळावे म्हणून युवक वेगवेगळे उपक्रम राबवू लागले. जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमातून थोर महापुरुषांची माहिती देण्यात येऊ लागली.
वृक्ष कटाईमुळे होणारे दुष्परिणाम पटवून देत वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे विचार विद्यार्थी मनावर बिंबविण्यात आले. यातून रक्षाबंधनाला वृक्षराखी उपक्रम राबविण्यात येऊ लागले. एड्ससारख्या महाभयंकर आजाराचे दुष्परिणाम सांगण्यात आले. सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. त्यामुळे स्वच्छता जनजागृती सारखे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. चिमुकले वेगवेगळ्या उपक्रमात सक्रियतेने सहभागी होत असल्याचे बघून पालकांत आनंद व्यक्त होत आहे.
