वडकी वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या तक्रारीला दाखवली केराची टोपली


वडकी विज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता यांचे शेतकऱ्यांना उद्धट भाषेत बोलणे ,शेतकरी उपोषणाच्या पवित्र्यात

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

  

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे २०२२ मध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता या वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत खांब पूर्णपणे जमीनीवर पडले होते व तारही तुटले होते या बाबत दिनांक ११/६ /२०२२ रोजी शेतातील विद्युत खांब व तुटलेले तार हे त्वरित दुरुस्त करून देण्यात यावे अशी तक्रार वडकी वीज वितरण विभागाला दिली होती परंतु आज एक वर्ष होत असून सुद्धा या तक्रारीकडे अजूनही वडकी वीज वितरण विभागाचे लक्ष दिसून येत नाही. रिधोरा येथील शेतकरी अरुण भाऊराव गाडगे, शेत सर्वे नंबर ४५/१ ब , दिनकर गुरनुले शेत सर्वे नंबर ४५/१अ, हनुमान भाऊराव गाडगे शेत सर्वे नंबर ४५/१ क , बाबाराव निकुडे शेत सर्वे नंबर ४७ , विनोद गाउत्रे शेत सर्वे नंबर ४८ अ. या वरील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत खांब वादळी वाऱ्याने तुटले होते याबाबत एक वर्षा पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी वडकी वीज वितरण विभागाकडे लेखी तक्रार सादर केली होती परंतु अजूनही या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत खांब व तुटलेले तार वडकी वीज वितरण विभागाने उचलले नाही. आता टोबणी, पेरणीचा हंगाम आला आहे. या शेतकऱ्यांनी करायचे तरी काय याबाबत वडकी वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे रिधोरा येथील या सर्व शेतकऱ्यांनी लेखी तक्रार देऊन सुद्धा तोंडी स्वरूपात सांगण्यासाठी महिन्यातून दोन, दोन वेळा चकरा मारून, मारुन थकून गेले आहे.परंतु अजून पर्यंत यांच्या शेतातले विद्युत खांब उचलले नाही. तर उलट शेतकऱ्यांना उद्धट भाषेत बोलून आल्या पावली परत केले जात आहे. सहाय्यक अभियंता यांनी शेतकऱ्यांना असे सांगितले आहे. की आता माझ्याकडे लेबर उपलब्ध नाही त्यामुळे मी काहीही करू शकत नाही माझ्याकडे याबाबत कुठलाही पर्याय नाही. कारण माझ्याकडे पोलची सुद्धा व्यवस्था नाही याबाबत तुम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार सादर करू शकता तर माझ्या सर्विस ला पंधरा वर्षे झाले आहे. तुम्ही कुठेही माझ्या विरोधात तक्रार घेऊन गेल्यास माझे कोणीही काही करणार नाही असे उद्धट भाषेत शेतकऱ्यांना बोलले असल्याचे येथील शेतकरी अरुण भाऊराव गाडगे व दिनकर गुरनुले यांनी सांगितले आहे. सदर पावसाळा तोंडावर आला असून येथील शेतकऱ्यांनी करायचे तरी काय ? या शेत शिवारात दोन खांब व चार ते पाच खांबा वरील संपूर्ण तारे जमीनीवर तुटून पडले आहे. हे खांब या चार ते पाच दिवसात वडकी वीज वितरण विभागाने उभे केले नाही तर आम्ही पाचही शेतकरी वडकी वीज वितरण विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू असे येथील शेतकरी अरुण भाऊराव गाडगे, दिनकर गुरनुले, हनुमान गाडगे, बाबाराव निकुडे, विनोद गाऊत्रे यांनी सांगितले आहे.