
सहसंपादक : रामभाऊ भोयर
“हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा…” या ब्रिद वाक्याला समोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य व निर्माण केले. मात्र, हे स्वराज्य केवळ एका विशिष्ट जाती किंवा धर्माचे नसून, ते खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील संविधानाच्या माध्यमातून हाच वारसा पुढे नेण्याचे काम केले .आजही साडेतीनशे वर्षांनंतर महाराजांचा हा सर्वसमावेशक दृष्टिकोन जगासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे.
भेदभावाला थारा नाही: गुणवत्तेला प्राधान्य देणारे शिवाजी महाराज आपल्या साठी कालही आदर्श होते आजही आहेत आणि उद्या सुद्धा राहतील असे प्रतिपादन डॉ.ओमप्रकाश फुलमाळी यांनी केले. गुजरी येथे शिवसुर्य जन्मोत्सव मंडळ द्वारे आयोजित “रयतेचे राजे ” शिवछत्रपती, या विषयावर आयोजित प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते . या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनिष काळे, प्रतिष्ठित नागरिक विलास निमरट, प्रमुख अतिथी पत्रकार किरण हांडे आदी मान्यवर उपस्थित होते . या वेळी शिवरायांच्या विषयावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचार मांडताना मनिष काळे यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य आजही आदर्श ठरत असल्यावर प्रकाश टाकला . प्रशासनात जात किंवा धर्म पाहून नव्हे, तर कर्तृत्व आणि निष्ठा पाहून पदे दिली जात असत. त्यांच्या सैन्यात आणि अष्टप्रधान मंडळात सर्व समाजातील अठरापगड जातींच्या मावळ्यांचा समावेश होता.
महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते, तर तोफखान्याची जबाबदारी इब्राहिम खान यांच्याकडे होती. त्यांचे खाजगी अंगरक्षक मदारी मेहतर आणि गुप्तहेर खात्यात महत्त्वाचे काम पाहणारे रुस्तुम-ए-जमान हे महाराजांच्या ‘धर्मनिरपेक्ष’ आणि न्याय्य भूमिकेचे जिवंत उदाहरण आहेत. शेतकऱ्यांप्रती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता .राजमात जिजाऊ यांच्या संस्कारातून ते तयार झाले आणि त्यांच्या संस्कारातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना तयार केले .असे मनोगत त्यांनी व्यक्त केले . विलास नीमरड यांनी शिवरायांच्या कार्याला पुढे घेऊन जायचे असेल तर काही ठोस पाऊले उचलावी लागतील ,त्या साठी गुजरी येथे विद्यार्थ्यांकरिता सार्वजनिक वाचनालय मंडळाने सुरू करावे ,ही अत्यंत चांगली जागा तुम्ही निवडली म्हणून मंडळाच्या सदस्यांचे कौतुक केले .पुढे कोणतीही मदत आपण या साठी करू,अशी ग्वाही देखील विलास निमरड यांनी दिली .
पुढे बोलतांना डॉ.ओमप्रकाश फुलमाळी यांनी शिवाजी महाराज यांच्या सर्वसमावेशक राजकारभारावर भाष्य केले .रामोशी, महार, मातंग, कोळी, आगरी आणि अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून महाराजांनी बलाढ्य मुघल सत्तेला आव्हान दिले.
धार्मिक सहिष्णुता आणि रयतेची काळजी
घेतली .शिवरायांनी कधीही दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष केला नाही. युद्धकाळातही “कुराण” सापडल्यास ते अत्यंत आदराने मुस्लिम सैनिकांच्या स्वाधीन केले जात असे. ‘परस्त्री मातासमान’ हे त्यांचे ब्रीद केवळ हिंदू स्त्रियांसाठीच नाही, तर शत्रूच्या गोटातील स्त्रियांसाठीही तितकेच लागू होते.
“रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका,” असा कडक आदेश देणारा हा राजा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आद्यप्रणेता मानला जातो.
आज जेव्हा जग जात आणि धर्माच्या नावावर विभागले जात आहे, तेव्हा शिवछत्रपतींचा ‘माणूस’ केंद्रस्थानी ठेवणारा विचार अधिक प्रकर्षाने जाणवतो. त्यांनी उभारलेले किल्ले आणि त्यांचे स्वराज्य हे केवळ दगड-धोंड्यांचे नसून ते समता, न्याय आणि बंधुभावाच्या पायावर उभे असलेले विचारांचे अधिष्ठान आहे. अशी मांडणी त्यांनी केली . कार्यक्रमाचे संचलन व आभार तेजस कांबळे यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसुर्य जन्मोत्सव मंडळ गुजरी च्या युवकांनी परिश्रम घेतले .
