दिलासा संस्थेच्या वतीने शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स लि. व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या लोकसह्भागातून कृषी व उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत राळेंगाव तालुक्यातील लोहारा, एकलारा, कृष्णापूर, श्रीरामपूर, शिवरा, मांडवा, पिंपरी दुर्ग, सोयटी, कोपरी, इंझापूर वालधुर, चिकना व दापोरी अशा एकूण 13 गावांची निवड केली असून, प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरावर महिला समितीच्या माध्यमातून प्रकल्पातील विकास कामे करण्यासाठी ग्रामसभेतून संयुक्त महिला समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून उपजिवीका उपक्रम राबविले जातात त्यामध्ये दुग्धव्यवसाय, शेळीपालन व्यवसाय, बोकड पालन व्यवसाय, कू्षी औजार बँका स्थापन करणे वन उपज ,मत्स्यपालन व्यवसाय डिजिटलायझेशन सेवेच्या माध्यमातून शासकीय योजनाचा लाभ, अभ्यास दौरा, कृषी आधारित व्यवसायावर डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण, लहान उद्योजकांना आर्थिक सहाय्य , जनावरांनसाठी पाणी पिण्याच्या टाके इत्यादी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या सदस्याचे प्रशिक्षण दिलासा ट्रेनिंग सेंटर, चोरंबा घाटंजी येथे आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाला एकूण 25 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
दिलासा संस्थेचे संस्थापक स्व. मधुकरभाऊ धस व बजाजचे संस्थापक स्व. राहुलजी बजाज यांच्या फोटोचे पूजन करून प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. प्रकल्पाच्या संपूर्ण माहिती याबाबतची माहिती प्रकल्प समन्वयक प्रशांत धनोकार व शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन बाबत साधन व्यक्ती म्हणून डॉ. महेश गुल्हाने यांनी शेळीच्या जाती कशा निवडावी ,दुध देणारी शेळी व मांसल प्रकारच्या शेळी यातील फरक, शेळीसाठी गोठा कसा असावा, शेळ्याची निगा कशी राखायची चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आजार व लसीकरण यावर मार्गदर्शन केले. त्या नंतर बचत गट व संयुक्त महिला समिती मार्फत हा व्यवसाय कसा पुढे न्यायचा यावर राळेगाव तालुका समन्वयक बालाजी कदम यांनी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाग्यश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलासा संस्थेचे कार्यकर्ते शितल ठाकरे यांनी मदत केली.