
राळेगाव तालुक्यातील येवती येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
एक ना धड भाराभर चिंध्या हा सर्वसामान्य माणसाला शासकीय कामाबाबत येणारा अनुभव नवा नाही. मात्र या तुघलकी कार्यपद्धतीने अंतिम टोकं गाठावे अशा काही घटना समोर येतात आणि थक्क व्हायला होते. असाच अनुभव येवती येथील गावंडे बंधूना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत येतो आहे. शेतजमीन अधिग्रहित एकाची, विहीर दुसऱ्याच्या शेतात. पाइपलाइन फुटून शेताचेही नुकसान आणि मोबदला शून्य असा तिहेरी वार हे शेतकरी सहन करत आहे. या बाबत समंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त पर्यंत लेखी तक्रारी दिल्या असून न्यायाची मागणी नोंदवली आहे. पंधरा वर्षा पासून ही लढाई हे शेतकरी बांधव लढत आहे.
ग्रामीण भारत निर्माण योजने अंतर्गत येवती येथील विजय कृष्णाजी गावंडे या शेतकऱ्याच्या शेतात पाणी पुरवठा विहिरीकरीता जमीन अधिग्रहित करण्यात आली. तसा करारनामा देखील करण्यात आला. जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग राळेगाव द्वार सन 2009 मध्ये हे काम करण्यात आले. मात्र हे कामं केल्या गेलें यादव कृष्णा गावंडे यांचे शेतात. सम्पूर्ण विहिरीचे बांधकाम होई पर्यंत आपली अधिग्रहित जागा चुकली आणि आपण दुसऱ्याच ठिकाणी विहीर बांधली याचा थांगपत्ता उपअभियंता व त्यांच्या टीम ला काही लागला नाही. समंधित शेतकऱ्यांनी ही बाब तत्कालीन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली मात्र आम्ही या विषयातले तज्ञ आहोत आम्ह्लाला सर्व कळते ह्या भीमादेवी थाटात या शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची चर्चा आहे.
अधिग्रहित जमिनीला फाटा देतं दुसऱ्याच ठिकाणी विहीर बांधल्याचा पराक्रम करूनच हा विभाग थांबला नाही तर निकृष्ट कामाचीही किनार त्याला आहे. स्विच रूम साठी तब्बल 20 आर च्या आसपास जमीन बेकायदेशीर पणे ताब्यात घेतली. वारंवार लिकेजेस, पाइपलाइन फुटणे या मुळे शेताचे प्रचंड नुकसान होतं आहे ते वेगळेच. एव्हडे सर्व होऊन झाले तरी संकटाचे शुक्लकाष्ठ काही थांबले नाही. या शेतकऱ्यांना आज पर्यंत कोणताही मोबदला देखील मिळाला नाही.
आता मोबदला मिळणार कसा हा ही प्रश्नच आहे. ज्याची जमीन अधिग्रहित केली तिथे विहीर बांधलीच नाही अन जिथे विहीर बांधली त्याची जमीनच अधिग्रहित केली नाही. मोबदला नेमका द्यायचा कुणाला हा देखील प्रश्न निर्माण झाल्याची माहिती आहे. पण यात त्या शेतकऱ्यांचा काय दोष असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे विहिरीचे बांधकाम होतं असतांना, जमीन अधिग्रहित करत असतांना. विविध आपसी समनव्याने कामं करीत असतात. त्या -त्या विषयातले तज्ञ
गलेलठ्ठ पगारावर नियुक्त केल्या गेलें आहे. त्यांच्या वारंवार भेटी प्रत्यक्ष कार्यस्थळी होतं असतात. तशी नियमावली देखील आहे. अशा वेळी या चुका होतं असतील तर शासनाच कामं म्हणजे आंधळं दळते व कुत्र पीठ खाते या सदरात मोडणारे असते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. राळेगाव तालुक्यात या प्रकरणाबाबत पाणी पूरवठ्याची विहीर चोरीला गेली दुसऱ्याच्या शेतात कोणी हो नेली, या सोबतच एकाची विहीर दुसऱ्याच्या शेतात चालत जाते तेव्हा… या अंगाने विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
