वर्ग मित्रांनीच दिला स्व. मित्राच्या कुटुंबियांना आधार,स्वर्गीय मित्राच्या कुटूंबियांना 2.5 लाखाची मदत

              .

विवेकानंद अध्यापक विद्यालयाच्या सन १९९८-२००० बॕचच्या वर्ग मित्रांनी आपल्याच स्व. मित्राच्या कुटुंबियांना केलेली रुपये २,५० ,००० ची मदत ही आजच्या युगात सामाजिकतेचे भान ठेवणा-या आदर्श वर्गमित्रांचे उदाहरण हे निश्चितच इतरांनाही प्रेरणा देईल असे उद्गार दि. २२ मे ला श्रीमती सिंधूताई होमेंद्र देवतळे , राहणार खरवड यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या एका छोट्या पण भावपूर्ण समारंभात अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना सुधीर धामट यांनी काढले .
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर धामट पुढे बोलतांना म्हणाले की ही मदत निश्चितच होमेंद्र देवतळेंच्या कुटुंबियांना मोठा आधार देइल . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खरवड येथिल विलास येळेकर , राघोजी झाडे , अनिल क्षिरसागर , विवेक खडसे , नामदेव देवतळे ,श्रीमती सुमित्राबाई देवतळे , श्रीमती सुधाताई देवतळे , महेश होमेंद्र देवतळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .
सविस्तर वृत्त असे की जवळपास आठ महिन्यांपूर्वी होमेंद्रचा कर्करोगाने अवेळी मृत्यू झाला . कुटुंबियांना उपचारासाठी घरची शेती ही विकावी लागली . डी एड होऊनही वय निघून गेल्यामुळे त्याला शिक्षक होता आले नाही . कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तो वरो-यातीलच एका कृषी केंद्रात तोकड्या पगारावर नोकरीला होता . होमेंन्द्र ची पहिली पत्नी डिलीव्हरी मध्ये गेली तेव्हा ती होमेद्रला एक बाळ देऊन गेली . यावेळीही हे त्याचे डी एड चे वर्ग मित्र मदतीला धावून आले होते . आता या मुलाचा सांभाळ करता येण्यासाठी होमेंद्रला दुसरे लग्न करावे लागले . त्याचा हा मुलगा महेश आता बी काॕम अंतिम वर्षाला आहे . दुस-या पत्नी सिंधुताईंना स्वतःच मुलबाळ नाही . त्यांनी अगदी लहाणपणा पासूनच महेशचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलेला आहे . आजही या मायलेकांच एकमेकांवर अतुट प्रेम आहे . शासकीय नोकरीत नसल्यामुळे होमेंद्रला ना कधी पगार मिळाला ना पेन्शन मिळणार होती . देवतळे कुटुंबियांवर आलेले संकट फार मोठे होते . अशावेळी बावीस वर्षांपूर्वी चे वर्ग मित्र ९ जानेवारी २०२२ ला आनंदवन वरोरा येथे एका स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले असतांना त्यांना होमेंद्र ची ही करुण कहाणी माहित झाली आणि नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांच्या मदतिला नेहमीच धावून जाणा-या या वर्गमित्रांनी होमेंद्रच्या कुटुंबियांना आधार देण्याचे ठरविले . पहाता पहाता एक मोठी राशी जमा झाली . त्याच रकामेतून रुपये २,५०,००० रुपयांचे फिक्स डिपाॕझीट श्रीमती सिंधूताईंना देण्यात आले . पुढे त्यांच्यासाठी एक अन्ड्राॕईड मोबाईल त्यांना भेट देऊन त्यांना कायम या मित्र परिवारात सन्मानपूर्वक सामिल केल्या जाणार आहे वर्ग मित्रांच्या व्हाटस अप ग्रुपवर त्यांना जोडून हा मित्र परिवार नेहमीच त्यांच्या संपर्कात रहाणार आहे असे डि एड वर्गमित्रांच्या वतीने गोपाळ गुडधे यांनी प्रास्ताविकातून सांगितले आहे .
यावेळी वर्ग मित्रांपैकी सुनिल पहापळे , किशोर गोंडे , संतोष उमाटे , किशोर गोवारदिपे , अजय भगत , गणेश राऊत , सविता राजनहीरे , वर्षा भगत उपस्थित होते