शिवार पाण्याखाली गेला , घरांचा गोठा होऊन गेला , रात्री अंकुरली स्वप्ने, पहाटे चिखल हाती आला

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

चिंतामणराव भगत यांचे गुजरी येथील शेतातील पीक पाण्याखाली गेलें, आस्टा रोडवरील केनाडी लगत संजय इंगळे, सुखानंद लोहकरे यांच्या शेतात जणू गँगामाय अवतरावी असे पाणीच पाणी चोहीकडे दृष्य निर्माण झाले. वरुड येथे मानसिंग वडते असेल, सखुबाई जाधव असतील शँकर मेश्रम असतील किंवा कांताबाई राठोड असतील असे असंख्य नावे सांगता येतील. या शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली गेलें. हे झाले शेत शिवाराचे दस्तूरखुद्द राळेगाव शहरातील सुभाष चोधरी यांचे दुकानात कमरभर पाणी साचून दुकानच पाण्याखाली गेलें. एका जनाची मोटरसायकल वाहत गेली. काही अंतरावर ती सापडली खरी पण असा भीषण प्रकोप अतिवृष्टी सदृश पावसाने राळेगाव तालुक्याला दाखवला. हजारो हेकटर जमिनीतील पिके खरडून गेली. दुबार पेरणीच्या संकटगर्तेत शेतकरी सापडला.
ग्रामीण भागात पावसाने झोडपले व नवऱ्याने मारले तर दाद कुणाकडे मागायची अशी एक म्हण प्रचलित आहे. मात्र यंदा च्या पावसाने शेतकऱ्यांना नको त्या वेळी नको त्या पद्धतीने झोडपून काढले आहे. काँग्रेस व मनसे च्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व गावकर्यांना शासकीय मदत देण्याची मागणीचे निवेदन ही देण्यात आले.
अनेक गावे या मुसळधार पावसाने क्षतीग्रस्त झाली. शेतीच्या नुकसानीचा अंदाज बांधता येणार नाही. धानोरा रोहनी नाला व धानोरा वाठोडा नाल्या जवळील शेकडो हेकटर मधील पीक आज पाण्याखाली दबले आहे. सोयटी, पिंपळखुटी, रावेरी, भांब, सावनगी, कोपरी, शेळी, अंतरगावं, वनोजा, चिखली येवती, रामतीर्थ, आस्था, बोरी, मेंघांपुर, वऱ्हा, नागठाणा, वाटखेड, सोनुर्ली या सह वडकी परिसरातील अनेक गावातील शेतकरी या मुसळधार पावसाचे बळी ठरले.
शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेला अस्मानी व सुलतानी संकटाचा ससेमिरा शेतकर्त्यांची पाठ सोडावयास तयार नाही. तीन वर्ष सातत्याने कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाला सामोरे जायची चिन्हे दिसताहेत. त्यातही राळेगाव तालुक्यात एकाचं दिवशी तब्बल 175 मी. मी. पावसाची विक्रमी नोंद होऊन तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. लगातार तीन दिवस पाऊसाने उसंत न घेता तालुक्यातील नागरिकांना जेरीस आणले. जमिनीतील पाण्याची पातळी वाढली ही दिलासा देणारी एक बाब वजा केल्यास झालेले नुकसान भरून निघणे कठीण आहे.
शेतीमध्ये लावणं साधने याला खूप महत्व असते. मढ झाकून पेरणी उरकून अंत्यसंस्कार केल्याची उदाहरण सांगणारे आज ही जिवन्त आहेत. पेरणी म्हणजे हंगामातील दुसरा जन्म होय. मुसळधार पावसाने यंदा या पेरणीच्याच नरडीला नख लावण्याचे कामं केले. पाऊस नेहमीच शेतकऱ्यांकरिता वरदान ठरत आला पण यंदा काही भागात त्याने हाहाकार निर्माण केला. राळेगाव तालुका दुर्देवाने त्यात मोडतो.
या पावसाने तालुक्यातील अनेक गावात घरांचे देखील प्रचंड नुकसान झाले. अनेक गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. कची घरे पडली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. पण गोर-गरिबांच्या संसाराचे मोठे नुकसान झाले.
हवामान खात्याने सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज आधीच वर्तविला होता. मात्र मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असाही अंदाज वर्तवण्यात आला होता. तो फोल ठरला. अनेक शेतकऱ्यांनी आधीच पेरण्या आटोपून घेतल्या पण पावसाने मृग नक्षत्रात दडी मारली. चार दोन सरी कोसळल्या खऱ्या पण त्या मुळे बियाणे अंकुरले व उन्हाच्या तीव्रतेने मातीआतच त्यांनी माना टाकल्या. शेतकऱ्यांनी परत उधार -उसनवार करून मेळ साधली या मुसळधार पावसाने त्यावर देखील पाणी फेरले. प्राथमिक अवस्थेतील पीक जास्त काळ तग धरून राहू शकतं नाही. इथे तर पूर्ण शेतच पाण्याखाली आले आहे. त्या मुळे हे संकट अधिक भयावह म्हणावे लागेल.
राजकीय सारीपाटावर राजसत्तेचा न भूतो न भविष्यती खेळ रंगत असतांनाच पावसाने आपली भीषणता अधोरेखित केली. निसर्ग कुणाची कधी गय करीत नाही. मात्र निसर्गाच्या प्रकोपाचा पहिला आघात हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. याची प्रचिती या पावसाने पुन्हा एकदा दिली. ” *मोडून पडले घरं तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा ” अशा प्रसंगी असा दिलासा देण्याची अपेक्षा असणारे माय-बाप सरकार कोण कोणाचा याच खेळात मश्गुल असल्याने तूर्तास ” ज्याने दिल्यात चोची देईल तोच चारा ” असे मन समजावण्या खेरीज आपल्या हातात काहीच नाही ही विष्णत्त| अस्वस्थ करणारी आहे.