ढाणकीतील बंद पथदिव्यांना सर्वस्वी जबाबदार महावितरण व विरोधकचं !,नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांची पत्रकार परिषदेत माहिती.

ढाणकी/प्रतिनिधी :प्रवीण जोशी

मार्च २०१९ मध्ये ढाणकी ग्रामपंचायतची नगरपंचायत मध्ये निर्मिती झाली. डिसेंबर २०१९ मध्ये नगरपंचायत निवडणूक पार पडली. व १ जानेवारी २०२० रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपचे सुरेश जयस्वाल यांनी पदभार स्वीकारला. नगरपंचायत निर्मितीपासून ते आजपर्यंतच्या दरम्यानच्या काळातील पथदिव्यांचे वीज बिल जवळपास सव्वा तीन वर्षाचे, एकूण २५ लाख वीज बिलाचा भरणा नगरपंचायतने नियमित भरला. परंतु ही रक्कम मागील ग्रामपंचायत काळातील थकबाकी वसुली आहे असे महावितरणचे म्हणणे आहे. या विरोधात नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी नगरपंचायत च्या सर्व सदस्यांच्या संमतीने महावितरण विरोधात ग्राहक मंचात तक्रार CC/21/197 दाखल केली. व यास लागणारा खर्च सुद्धा नगरपंचायत तर्फे देण्याचे सर्वानुमते ठरले. यात उपनगराध्यक्ष शेख जहीर अहमद शेख मौला यांची सुद्धा सहमती होती. या तक्रारीमध्ये नगरपंचायत तर्फे स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आले की, आम्ही २५ लाख ही नगरपंचायत काळातील वीज बिलाची पूर्ण रक्कम भरली आहे. ग्रामपंचायत काळातील थकबाकी नाही. यावर कोर्टातर्फे ऑर्डर देण्यात आली की, तुम्हाला सध्या आलेल्या उपलब्ध बिलाच्या ३०% रक्कम भरा. यावर दिनांक १५/७/२०२२रोजी नगरपंचायत तर्फे महावितरणने पाठविलेल्या चुकीच्या बिलात दुरुस्तीची मागणी केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, महावितरणने पाठविलेल्या बिलात वरील बाजूस ४ कोटी ४२ लाख ६१ हजार ५७० रुपये एकूण थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरा असे सांगितले. व त्याच परिपत्रात खालच्या बाजूस २कोटी ९५ लाख ९९ हजार १०० रुपयाच्या ३० टक्के म्हणजे ८८ लाख ७९हजार ७३० रुपये रक्कम भरा. या आकड्यांच्या तफावतीबद्दल नगरपंचायतने महावितरण कडे स्पष्टीकरण मागविले.एवढेच नव्हे तर पथदिव्यांबाबतीत लागणारे चारही मीटर आधी बंदावस्थेत होते. ते जानेवारी २०२२ ला बसविण्यात आले. मीटर बंद अवस्थेत असतानाचे चार मीटरचे बिल ७लाख ७हजार ३७६ रुपये प्रति महिना म्हणजे १ मिटरचे बील १ लाख ७६ हजार ८४४रु. प्रति महिना आणि मीटर बसविल्यानंतर चारही मीटरचे अंदाजे १३ ते १५ हजार रुपये प्रति महिना विज बिल येत आहे. ही सुद्धा तफावत नगरपंचायत च्या लक्षात आली. यावरून महावितरणचा काळाबाजार नगरपंचायत च्या लक्षात आला. व ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्यामुळे नगरपंचायत चा पर्यायाने शहराच्या विकासाचा पैसा महावितरणच्या घशात जाण्यापासून वाचला. परंतु त्यावेळी सहमती देणारे उपनगराध्यक्ष शेख जहीर अहमद शेख मौला यांनी कालांतराने नगराध्यक्षाच्या बदनामी कारक बातम्या व हे प्रकरण नगराध्यक्षांनी कोर्टात नेले म्हणून पथदिवे बंद ची बदनामी सोशल मीडियावर करणे सुरू केले. असा आरोप नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत केला .
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महावितरण संचालकाचे परिपत्रक आले. ग्रामीण भागात चालू बिलाचे देयक घेऊन वीज जोडणी पूर्ववत करा. तर वस्तुस्थिती ही आहे की नगरपंचायत नियमाने ग्रामविकासचे थकीत देऊ शकत नाही. आम्ही नगरपंचायत आहोत आम्ही आमच्या काळातील विज बिल पूर्णपणे भरले असून, आमची वीज जोडणी पूर्ववत करायला हवी. परंतु असे न होता वीज जोडणी न करता ढाणकीचे उपनगराध्यक्ष व महावितरण जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो अशी तक्रार दि.२७/५/२०२२, १५/७/२०२२ व १९/७/२०२२ या दिवशी पोलीस स्टेशन बिटरगाव कडे केल्याचे सुद्धा नगराध्यक्षांनी म्हटले.
कायद्याला धरून पाठपुरावा करीत असताना शेख जहीर शेख मोला यांनी माझे विरोधात अनेक वर्तमानपत्रात चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर चुकीचे मेसेज टाकून नागरिकांची दिशाभूल केली. ज्या माणसास लिहिता- वाचता येत नाही त्यांनी, एका नगरपंचायत तांत्रिक सल्लागाराच्या नियुक्ती करिता दिनांक १७/५/२०२२ च्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये चुकीच्या पद्धतीने ठराव नामंजूर केल्यामुळे, जिल्हाधिकाऱ्याकडे कलम ४४ कलम१६(१) व अ व (ह-अ) १ नुसार संबंधित सदस्य शेख जहीर अहमद शेख मौला व नुरजना बेगम शेख हुसेन या दोन्ही स्थायी समिती सदस्यांना नगरपंचायत मधून बडतर्फ करण्याची कारवाई केली. त्यांची दि.८/८/२०२२ ला जिल्हाधिकाऱ्यांसमोर पेशी आहे. अशी माहीती नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.