

ढाणकी (प्रवीण जोशी)
यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून हा काळा डाग पुसायचा असेल तर शेतकऱ्यांनी शेती सोबतच दुग्ध व्यवसाय करतांना दुधाचे मूल्यवर्धन करून आपले अर्थार्जन वाढवावे. मुल्यवर्धित दुग्ध पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान आत्मसात करून फायदेशीर दुग्ध व्यवसाय करावा. असे प्रतिपादन मा. कर्नल. प्रा. डॉ. आशिष पातुरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी केले.
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय,वरुड (पुसद ) व ग्रामपंचायत गांजेगाव ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मूल्यवर्धीत दुग्ध पदार्थनिर्मिती तंत्रज्ञान’ ह्या एक दिवशीय महिला सक्षमिकरण प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. अनिल भिकाने,संचालक विस्तार शिक्षण,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम डॉ. प्रशांत वासनिक, अधिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञान शाखा,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व सहयोगी अधिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, वरुड (पुसद ) यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर माजी पोलीस अधिकारी देवराव दिवसे, सरपंच सौ जयश्री दिवसे, राम इटकरे , डॉ अतुल ढोक , सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळे आदी उपस्थीत होते.
प्रा. डॉ.अनिल भिकाने यांनी मूल्यवर्धीत दुग्ध पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण घेण्याऱ्या उपस्थित महिलांच्या सकारात्मक मानसिकतेचे कौतुक करत, प्रशिक्षण ही केवळ सुरुवात असुन महिलांनी तिथेच थांबू नये तर उद्योजक बनावे असा संदेश दिला.
डॉ. प्रशांत वासनिक यांनी महिलांनी आपल्यातल्या क्षमता जाणून त्यानुसार उपयोगी तंत्रज्ञानाचा वापर करून विविध मूल्यवर्धीत दुग्ध पदार्थाचा गांजेगाव पॅटर्न नावारूपास आणवा असा संदेश दिला.
दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, वरुड (पुसद)हे नेहमीच विविध प्रशिक्षण आयोजित करीत असल्यामुळे दुग्ध व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान गावपातळी पर्यत पोहचते, त्यामुळे या संधींचा महिला बचत गट तसेंच शेतकऱ्यांनी लाभ घावा असे प्रतिपादन डॉ. नितीन शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत केले तर सचिन शिंदे यांनी विविध मूल्यवर्धीत दुग्ध पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षित प्रशिक्षणार्थींना करून दाखविले. प्रशिक्षणाला 15 बचत गटाच्या 150 महिला व 100 शेतकरी उपस्थित होते.विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिशय दुर्गम अशा गांजेगावात येऊन प्रशिक्षण कार्यक्रम घेतल्या बद्दल गांजेगावचे देवराव दिवसे यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांजेगावच्या सरपंच श्रीमती जयश्री दिवसे व त्यांचे सहकारी, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयचे संजय पांनझाडे, पंकज पवार, अजीम शेख व प्रकाश डोंगरे यांनी परिश्रम घेतले.
