वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे शेतातील पीक असुरक्षित ,शेतकऱ्यांना बसतो आर्थिक फटका

संग्रहित


बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांमधुन मागणी


तालुका प्रतिनिधी/ मारेगाव:प्रफुल्ल ठाकरे


पशुपक्षी तथा वन्य प्राण्यांना मानवाप्रमाणेच जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी वन्य जीव संरक्षण कायदा करण्यात आला. परंतु वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे शेतातील पीक व उत्पादन करणारा शेतकरी असुरक्षिततेच्या गर्तेत असुन शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे.
उन्हातान्हाची कुठलीही तमा न बाळगता ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी पेलत शेती मशागती पासुन तर पेरणी व पीक हाती येईपर्यंत अहोरात्र राबुन लहान मुलासारखे लालन पालन,व संवर्धन करतो. पीकांना कीडीपासुन वाचविण्यासाठी फवारणी, निंदन खुरपणी करतो.यासाठी शेतकरी राजाला जास्तीचा आर्थिक बोजा सहन करावा लागत असुन भविष्यातील आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी डोळ्यात अंजन घालुन राबत असतानाच, मात्र रोपटे मोठे होऊन बहरल्यानंतर वन्य प्राण्यांपासून शेतातील पीकाचे रक्षण करण्यासाठी शेतकरी राजाकडे कोणताही पर्याय उपलब्ध नसतो.
वनसंपदेनी नटलेला मारेगाव तालुका बहुतांशी जंगल व्याप्त असल्याने वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. डोळ्यात तेल घालून जीव धोक्यात टाकून शेतीची रखवाली केली तरी वन्य प्राणी, रानडुकरांचे कळप, रोही शेतात येऊन पऱ्हाटी व तुरीच्या झाडाचे नुकसान करत असल्याची माहीती आहे.शेतातील बहरलेले पीक सरसकट उपटुन टाकल्या जात असताना शेतकरी जीवाच्या भितीने उघड्या डोळ्यांनी पहात राहण्याशिवाय काहीही करु शकत नाही. संपुर्ण शेतातील पीक वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे, शेतकरी अजुन आर्थिक खाईत ढकलल्या जात आहे. एकुणच शेतकरी व शेती पिकासाठी तथा शेतकऱ्यामध्ये वन्यप्राण्यांमुळे असलेली असुरक्षिततेची भिती काढण्यासाठी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल याकरिता ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे तालुक्यात बोलल्या जात असुन बंदोबस्त करण्याची मागणी सुध्दा होत आहे.
(