अर्जुनी येथे जाणाऱ्या जोड मार्गावर चिखलाचे साम्राज्य ग्रामस्थ करतात तारेवरची कसरत



लोक प्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष


तालुका प्रतिनिधी:प्रफुल्ल ठाकरे ,मारेगाव


तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे अर्जुनी येथे जाणारा जोड मार्ग चिखलमय झाला असुन ग्रामस्थांची चिखलामधुन वाट शोधतांना तारेवरची कसरत होत आहे. याबाबत प्रशासनासह लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलल्या जात असुन रोष व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागाची नाळ शहरासोबत जुडावी यासाठी गाव तेथे रस्ता तोही पक्का हे ब्रिद वाक्य आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक जोड मार्ग तयार झाल्यापासून त्यावर कधि दुरुस्ती झाली नसल्याने तालुक्यातील अनेक जोड मार्ग अखेरची घटका मोजत असतानाच, तालुक्यातील नवरगाव पासून जवळ असलेले हजार लोकसंख्येचे अर्जुनी हे खेडे गाव असुन अर्जुनी येथे जाण्यासाठी घोंसा रोडवरून जवळपास पाचशे वर मीटर लांबीचा जोड मार्ग आहे. ह्या जोड मार्गाची निर्मिती काही वर्षांपासून करण्यात येवुन या मार्गाचे खडीकरण करण्यात आल्याची माहीती आहे. खडीकरण झाल्यानंतर मात्र या मार्गाकडे कुणी आस्थेने पाहीले नसल्यामुळे आज तागायत ह्या जोड मार्गाचे कधी मजबुतीकरन झालेच नाही.
दरम्यान अर्जुनी येथील ग्रामस्थांनी प्रशासनासह लोक प्रतिनिधींना मौखिक तथा लेखी निवेदन सुध्दा दिले. परंतु आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून आश्वासनाखेरीज दुसरे काहीच मिळाले नाही. परिणामी पाचशेवर मिटर लांबीचा हा जोड मार्ग दुरुस्तीच्या आजवर प्रतिक्षेत असुन या चिखलमय झालेल्या रस्त्यावर वाट शोधत ग्रामस्थ तालुका स्थळावर ये जा करत असल्याचे वास्तव आहे. या चिखलमय जोड मार्गाबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष असुन रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.