

आमदार प्रशांत बंब हा केवळ एक मोहरा असून यामागे ग्रामिण भागातील शिक्षकांना बदनाम करुन हळूहळू हे क्षेत्र खाजगी क्षेत्रात वळविण्याचे हे एक फार मोठे षडयंत्र असल्याचे मत प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक धनराज रेवतकर यांनी व्यक्त केले . सविस्तर वृत्त असे की पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यासंदर्भात भाग क्रमांक ५२ , शालेय शिक्षण विभाग संबंधात बोलतांना आमदार प्रशांत बन्सीलाल बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालयी न रहाताही घरभाडे उचलण्यासंबधीचा प्रश्न मांडतांना शिक्षकांसाठी अतिशय पातळी सोडून भाष्य केले . हे महोदय शिक्षकांचा पगार बंद करुन टाकायला पाहिजे इथपर्यंत पोहचले . जेव्हा की अगदी अलिकडेच जि. प. कर्मचा-यांनी मुख्यालयी रहाण्यासंदर्भात एक जनहीत याचिका दाखल केली होती .त्यात रिटपिटीशन 5822/2014 चा संदर्भ देत मा. चिफ जस्टीस यांनी शासनास डायरेक्शन देऊन याचिका खारिज केली . जिल्हापरिषदेचा कर्मचारी मुख्यालयी न राहिल्यास कोणतिही कारवाई करता येणार नाही या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा एकदा बंब यांनी अभ्यास करावा असेही ते म्हणाले . ते पुढे म्हणाले की निश्चितच क्वालिटी एज्यूकेशन महत्वाचे आहेच पण ते देता येण्यासाठी शिक्षकांवर लादलेली असंख्य अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावीत असे मत त्यांनी व्यक्त केले . समन्वय समितीचे समन्वयक गणपत विधाते यांनी या वक्तव्याचा निषेध करत यापुढे सरकारचे याबाबत पुढील धोरण काय रहाणार आहे ते मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कळवावे जेणेकरुन आम्हालाही संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन योग्य ती भूमिका घेता येईल असे मत व्यक्त केले .
यावेळी वरोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती , वरोरा च्या वतीने अनेक संघटना यात सहभागी झाल्या होत्या ज्यामध्ये अखिल वरोरा प्राथमिक शिक्षक संघ , पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना , कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ , ओबीसी कर्मचारी संघटना , प्रहार प्राथमिक शिक्षक संघटना , पंजाबराव देशमुख प्राथमिक शिक्षक संघटना , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना जिल्हा चंद्रपूर सहभागी झाल्या होत्या . सर्व संघटनांच्या अध्यक्षांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले . नंतर शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना लिहिलेले निवेदन तहसिलदार वरोरा यांचेमार्फत मा. मुख्यमंत्र्यांना पाठविले . यावेळी मोठ्या संख्येत महिला शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते .
