“श्रीं” चे जिल्हाभरात थाटामाटात आगमन.

हदगांव ( कृष्णा चौतमाल प्रतिनिधी )

– कोरोणामुळे मागील सलग दोन वर्ष गणेश उत्सव साजरा करता आला नाही. परंतु आता संपूर्ण वातावरण कोरोना मुक्त झाले असून लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी श्री भक्त सज्ज झाले आहेत. बुधवार दी ३१ गणरायाचे आगमन होणार असून बाजारपेठा श्रींच्या मूर्ती सजावटीचे व पूजेच्या साहित्या ने गजबजल्या आहेत.
श्री गणेश चतुर्थी सण हिंदू धर्माचा मोठा सण आहे. सार्वजनिक तसेच घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. दीड दिवसाच्या गणेशोत्सवापासून ते ११ दिवसाच्या गणेशोत्सवाची पारंपरा आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत. दरम्यान पूर्व संध्येला मंगळवारी बाजारपेठेत गणरायाच्या आवडीच्या पूजेच्या वस्तू व साहित्य खरेदी करण्यात दिवसभर गणेशभक्त व्यस्त होते.
बाजारपेठेतहि घरगुती ते सार्वजनिक सुबक अशा लहान व मोठ्या आकारातील गणेश मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना अधिक मागणी असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसा पूर्वी गणेश मंडळानी मूर्ती खरेदी करून ठेवल्या आहेत. आज उत्साहाच्या वातावरणात गुलाल , फुले उधळात ढोल ताश्याच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत गणेश भक्त करणार आहेत. कमळ केळीचे खांब विविध फळ काकडी दुर्वा आगडा केन्ना मोदक हाराळी हळदी कुंकू शिफळ घट यासह आदी साहित्याच्या खरेदीसाठी महिला वर्गाची विशेष गर्दी होती. गणरायाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. जिल्ह्यामध्ये दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्वच प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मंडळाच्या वतीने विधायक देखावे सार्वजनिक उपक्रम राबविण्यात येतात.
दरम्यान गणेशोत्सवा प्रमाणेच गौरीपूजन हा देखील महत्वाचा सण आहे. शनिवारी ( दि ३ सप्टेंबर ) जेष्ठा गौरीचे आगमन होणार आहे. या सणाची तयारीही नागरिकाकडून केली जात आहे.