
प्रवीण जोशी
ढाणकी
बंदी भागातील अनेक शेतकरी यावेळी मध्यवर्ती बँकेत पैसे काढायला आले होते. पण आजही त्यांच्या नशिबी वाट पाहणे दशा याशिवाय काहीही हाती लागले नाही. बँकेचे व्यवहार हे पाच वाजल्याच्या नंतरही चालूच होते यावरून कॅश उपलब्ध नव्हती व ती बराच उशिरा उपलब्ध झाल्याचं समजते. पिंपळगाव, जेवली, मोरचंडी, देवरंगा या ठिकाणाहून सुद्धा शेतकरी पैसे काढण्यासाठी आले होते. सकाळी लवकर घरून निघाल्यानंतर त्यांना पोटाची खळगी भरायची असल्याकारणाने अनेक जणांनी आपल्या सोबत रोटी सुद्धा बांधून आणली होती कारण त्यांना माहीत होतं की बँकेत जाणे म्हणजे किती वेळ काळ लागू शकेल हे सांगता येत नाही. पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी नव्हती.
पंतप्रधान सन्मान निधी काही दिवसांपूर्वी जमा झाला हे पैसे काढण्यासाठी मध्यवर्ती बँकेत आज शुक्रवारी दिनांक २८ रोजी गर्दी होती अनेक खेडेगावच्या शेतकऱ्यांची व्यवहार होत असताना बँकेच्या कामाचा व व्यवहाराचा व्याप मोठा असताना कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. थकलेल्या बैलावर आऊत आणल्यासारखे येथील व्यवहार मंद पद्धतीने होत असताना बँकेच्या दर्शनी भागावर डझनभर संचालकांची नवे असलेल्या मंडळींना ही बाब लक्षात नाही ??
सर्वसामान्य असलेल्या सभासद शेतकऱ्यांनी संचालक म्हणून निवडून दिले ते फक्त त्यांच्या नावापुढे संचालक ही उपाधी लावण्यासाठीच का?? समस्या सोडवण्यासाठी संचालक नसून केवळ समस्या बघण्यासाठी आहेत की काय असा संतप्त सवाल या वेळेस सभासद खातेदार शेतकरी व्यक्त करत होते.
कायमस्वरूपी शिपाई सुद्धा या शाखेला नसल्याचं समजते. एवढ्या आजूबाजूच्या परिसराचा डोलारा या शाखेवर असताना कायमस्वरूपी शिपायाची वानवा कर्मचाऱ्यांची कमतरता व यामुळे आता येथे शासकीय आलेल्या शेतकऱ्याच्या अनुदानापुरतेच खातेदार आपले नाते ठेवतील की काय अशी शंका निर्माण होते. असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा कार्यान्वित आहे की नाही अशी शंका उपस्थित होते कारण त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात धूळ दिसून येत होती.
