
“”यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण :राळेगाव तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात अभिमानाची सुवर्ण नोंद करत पंचायत समिती राळेगाव अंतर्गत तब्बल ५९ विद्यार्थ्यांनी NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, यापैकी ३७ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधील असून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर अत्यंत स्पर्धात्मक मानली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या परीक्षेत एवढ्या मोठ्या संख्येने यश मिळवणे ही केवळ आकड्यांची बाब नसून राळेगावच्या शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचा ठसा आहे.या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे तीन मजबूत आधारस्तंभ ठरले. मात्र यंदाच्या निकालामागे सुयोग्य नियोजनाची भक्कम पायाभरणी देखील तितकीच महत्त्वाची ठरली. गटविकास अधिकारी केशव पवार यांच्या नेतृत्वाखाली परीक्षेचे प्रभावी नियोजन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने आणि गटविस्तार अधिकारी (शिक्षण) निलेश दाभाडे यांनी अत्यंत बारकाईने आखणी करून अंमलबजावणी केली. तालुक्यातील विविध केंद्रांवर विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये स्वतः अधिकारी व केंद्रप्रमुखांनी तासिका घेत विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन केले.या सर्व प्रयत्नांचा परिपाक म्हणजे राळेगाव तालुक्याचा NMMS निकाल ‘दमदार, दर्जेदार आणि अभिमानास्पद’ ठरला आहे. हा निकाल केवळ यश नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा जाहीर पुरावा आहे! सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापकांचे, शिक्षकवृंदाचे व केंद्रप्रमुखांचे मनःपूर्वक अभिनंदन! राळेगाव तालुका वसियांकडून करण्यात आले असून राळेगाव तालुक्याची ही यशोगाथा भविष्यातील अधिक मोठ्या शैक्षणिक झेपेची नांदी ठरो, हीच अपेक्षा! व्यक्त करण्यात आली आहे.
