
प्रतिनिधी//शेख रमजान
गाव दारूबंदीचा ठराव असूनही प्रत्यक्षात दारू विक्री सुरूच असल्याने बिटरगांव (बु) व नगर परिसरातील महिलांचा संयम अखेर सुटला. अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी, या ठाम मागणीसाठी महिलांनी
एकत्र येत बिटरगांव (बु) पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना लेखी निवेदन दिले.
निवेदनात महिलांनी स्पष्ट आरोप केला आहे की, ग्रामपंचायत बिटरगांव (बु) अंतर्गत दारूबंदीचा ठराव वर्षानुवर्षांपूर्वी मंजूर झालेला असतानाही आजही गावात गल्लीबोळांत, वस्त्यांमध्ये खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. “दारू विक्रीला नेमकी कुणाची मूक संमती आहे?” असा थेट सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
अवैध दारूमुळे गावातील पुरुष, युवक आणि तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून घराघरांत भांडणे, मारहाण, आर्थिक कर्जबाजारीपणा व महिलांवरील अन्याय वाढत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. अनेक महिलांचे संसार उध्वस्त होत असून शांतताप्रिय गावात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे शाळा, मंदिर व सार्वजनिक ठिकाणांच्या आसपासही दारू विक्री सुरू असून याचा थेट परिणाम लहान मुलांच्या शिक्षणावर व त्यांच्या भवितव्यावर होत आहे. “मुलांच्या हातात वही असताना समोर दारूची बाटली दिसते, ही लाजिरवाणी बाब आहे,” अशा शब्दांत महिलांनी संताप व्यक्त केला.
दारूच्या व्यसनामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या वाढत असून अनेक कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे संबंधित दारू विक्रेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा महिलाच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी महिलांचे निवेदन स्वीकारून चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र आता फक्त आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली आहे.
या निवेदनाच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उमरखेड तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना देण्यात आल्या असून, प्रशासन वेळेत हालचाल न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.
