
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दोनच वेच्यात होणार कापसाची उलंगवाडी उत्पन्नात कमालीची घट शेतकरी सापडला आर्थिक कोंडीत
दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून आधीच अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकांवर शेतकऱ्यांची भीस्त होती मात्र डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांपुढे आता नवीन संकट उभे झाले आहे. खरिपातील सोयाबीनचे पीक हातून गेल्यानंतर आता शेतकऱ्यांची कापसावर भिस्त होती. मात्र, सध्या कापसाच्या पिकावर ‘लाल्या’ रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने खरीप हंगाम पूणर्तः शेतकऱ्यांच्या हातून गेला. गत काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची बोंडेही भिजली. त्यामुळे आता कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली तालुक्यातील अनेक गावातील शेतातील कापूस पिकांवर ‘लाल्या’ रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाला आहे. कापसाची हिरवीगार पाने लालसर पडून वाळू लागली आहे त्यामुळे कापसाच्या दोनच वेच्यात उलंगवाडी होणार असल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच सोयाबीन पीक वाया गेल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कापसावर भिस्त होती. ‘लाल्या’ रोगाने कापसावर अतिक्रमण केल्याने कापसाच्याही उत्पन्नाची आशा मावळली आहे
शासकीय यंत्रणेचे ढिसाळ नियोजन, शेतकरी त्रस्त
या गंभीर परिस्थितीत शासकीय यंत्रणांचे ढिसाळ नियोजन आणि वेळकाढूपणा शेतकऱ्यांच्या संतापाला कारणीभूत ठरला आहे. कृषी शास्त्रज्ञांनी संभाव्य रोगराईबद्दल शेतकऱ्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन पोहोचवले नाही. कृषी खात्याच्या वेळकाढू वृत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘संभाव्य रोगराई’च्या बाबतीत शेतकऱ्याला वेळेत सतर्क केले असते आणि उपाययोजना सांगितल्या असत्या, तर आज ही बिकट परिस्थिती नक्कीच टळली असती. एकीकडे पीक संकटात असताना शासन शेतकरी प्रश्नांवर फारसे गंभीर दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया बळीराजा व्यक्त करत आहे.
कपाशीवरील ‘लाल्या रोगाने शेतकरी हैराण
कापसावर आलेल्या ‘लाल्या’ रोगाने शेतकरी हैराण झाला आहे. कापसाच्या उत्पन्नावर घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, वर्षांचे आर्थिक नियोजन कसे करावे, कर्जाच परतफेड कशी करावी, हा प्रश्न पडला आहे.
