
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव
हदगांव – आज तालुक्यातील कोळी ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.
निजामशाहीच्या राजवटीतील नागरिकांनी देशाच्या अन्य भागापासून प्रेरणा घेत स्वातंत्र्याचा लढा उभारला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली लढा उभारला. मराठवाड्याच्या गावागावात हा स्वातंत्र्य लढा लढला गेला. प्रत्येक गावामधून स्वातंत्र्य सैनिक पुढे आले. त्यांनी प्राणांची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू केलं. संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांची भारत देशामध्ये विलिन होण्याची इच्छा होती.
मराठवाड्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याचा ध्यास घेतला होता. ‘ आम्हाला भारतामध्ये विलिन करा’ ही एकच मागणी त्यांची निजामाकडे होते. पण, निजामाला ही मागणी मान्य नव्हती. निजामाचा सेनापती कासिम रिझवी याने मुस्लीम स्वयंसेवकांची मोठया प्रमाणात सैन्यात भरती केली. त्याने उभारलेले सैन्य हे रझाकार म्हणून ओळखले जात असे.
संपूर्ण मराठवाड्यात या रझाकारांची दहशत होती. या रझाकारांनी नागरिकांवर असंख्य अत्याचार केले. मराठवाड्यातील एकही जिल्हा, जिल्ह्यातील कोणतेही गाव त्यांच्या तावडीतून सुटले नाही. या रझाकारांच्या जीवावर स्वतंत्र देश तयार करण्याची निजामाची महत्त्वकांक्षा होती.
निजामाची ही फुटीर वृत्ती भारत सरकारला मान्य नव्हती.देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभाई पटेल यांच्याकडे देशातील संस्थानिकांच्या विलिनिकरणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी निजामाशी सुरूवातीला चर्चा करत हा प्रश्न शांततेनं सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, निजामाला हे मान्य नव्हते.
चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर भारत सरकारनं लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सरदार वल्लभाई पटेलांनी निजामाच्या विरोधात ‘पोलीस अॅक्शन’ ची घोषणा केली. भारतीय लष्कराच्या पराक्रमापुढे निजामाच्या रझाकारांनी गुडघे टेकले. मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली. मराठ्यावाचे नागरिक आता भारताचे नागरिक बनले.
निजामाची जुलमी राजवट उलथवून स्वातंत्र्याची नवपहाट आणण्यासाठी ज्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले, त्यांचे आयुष्य वेचले त्या सर्वांना माझे शत शत नमन. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज ग्रामपंचायत कार्यालय कोळी येथे साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कोळी गावचे सरपंच प्रा. संजीव कदम , उपसरपंच प्रतिनिधी संतोष पा. चौतमाल , गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील चौतमाल , विशाल पाटील क्षीरसागर , कृष्णा पाटील चौतमाल , नितु पाटील , भागवत पाटील कदम , विनायक क्षीरसागर , बालाजी कदम पाटील , सुभाष हाटकर , राहुल पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते.
