
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
तळागाळातील गोरगरीब वंचित मनुष्य ज्ञानाच्या प्रवाहात यावा शिक्षित व्हावा म्हणून महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर संत गाडगेबाबा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सरकारच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेची निर्मिती केली परंतु काळानुरूप आत्ताच्या शाळांमध्ये शासन प्रशासनाकडून शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्या अतिरिक्त अशैक्षणिक कामाचा इतका भार लादला की शिक्षकांना अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यास वेळच मिळत नसल्याचे वास्तविक चित्र दिसते .
आज शिक्षण विभागाची अवस्था गडबड नगरी गुळसर राजाप्रमाणे झाली आहे. शिक्षकांना एवढे अशैक्षणिक कामे दिली आहेत की त्यामुळे तो शिकविणे तर सोडाच साधा वर्गात जाण्यासाठी सुद्धा वेळ नाही हे जळजळीत वास्तव आहे. मुख्यतः प्रशासकीय यंत्रणा ही मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मदतीसाठी असते परंतु आज ही सर्व यंत्रणा प्रभारी मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मालक होऊन बसले आहे. केवळ आदेश देणे हुकूम गाजवणे वाटेल ते काम सांगणे एवढेच यांचे कार्य उरले आहे (काही अपवाद वगळता). सचिवालयातून आलेला टप्पा हा प्रत्येक अधिकारी पुढे ढकलत ढकलत शिक्षकावर आणून टाकतात या कामात शिक्षकाला एवढे गुंतवले आहे की शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायला वेळच मिळत नाही हे वास्तव आहे.
जसे विद्यार्थी आधार लिंक करा, मिस मॅच, मतदार आधार लिंक, मतदार नोंदणी, जन्मतारीख नावातील स्पेलिंग चूक, बँक खाते काढणे, इतर प्रशिक्षण व इतर अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकाच्या मागे लावून दिली जात आहे. मात्र या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तर कहरच करत आहे यांचा प्रकार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर. प्रत्येक शिक्षक डीएड आहेत म्हणजे प्रशिक्षित आहे मग त्यांना जास्तच प्रशिक्षण कशासाठी. प्रशिक्षण देणारे ही डीएड, बीएड कॉलेज आहे आहे की नाही शिक्षण विभागाचा अजब गजब कारभार. त्यातच पुन्हा शालेय पोषण आहार यातील साहित्य प्रत्येक विद्यार्थ्याला मिली ग्राम मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मोजून व त्या सर्वांचे नोंद ठेवावी लागते. त्यात चव रजिस्टर, भेट रजिस्टर, पोषण आहार समिती रजिस्टर, नमुना रजिस्टर, मालाची गुणवत्ता या सर्वांची ऑनलाईन माहिती भरणे याचे बिल चार सहा महिन्यांनी मिळणार व यात कोणत्याही कामात हलगर्जीपणा किंवा छोटीशी चूक झाली तर शिक्षकाचे निलंबन. हे सगळे काम शिक्षकाला करावे लागतात. शिक्षक हे सगळं काम करणार की शिकवणार हे न उलगडणारे कोडे आहे.
हे वरील सर्व कामे जिल्हा परिषद शिक्षकांना करावी लागतात ह्या कामात हाय काय झाल्यास शिक्षकावर कार्यवाहीची भीती राहते त्यामुळे शिक्षक ह्याच कामात गुंतून असतो व शैक्षणिक कामावर दुर्लक्ष होते. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकाकडे हे अशैक्षणिक कामे सोपवून जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब वंचित सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा शासन प्रशासनाने खेळखंडोबा लावल्याचे दिसते. तरी शासन प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन शिक्षकाकडे फक्त शैक्षणिक कामे सोपवून गोरगरीब वंचित सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये अशी सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी आहे.
