
वणी :नितेश ताजणे
संपूर्ण विदर्भात ज्या क्रिकेट स्पर्धेची चर्चा होती त्या टि – 10 चॅम्पियन लीगचे आज गुरुवारी सकाळी 12 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा हे होते. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी व्यासपिठावर विजय पिदूरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, विजय चोरडिया, कुणाल चोरडिया, संदीप बेसरकर यांची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात बोलताना माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर म्हणाले की देशाचा प्रत्येक तरुण हा खेळाडू बनला पाहिजे. निरोगी जीवनासाठी खेळ खेळणे अत्यंत गरजेचे आहे. असे ते म्हणाले. यापुढेही सातत्याने अशा स्पर्धा व्हायला पाहिजे. त्यामुळे खेळाडुंना प्रोत्साहन मिळेल व खेळालाही चालना मिळेल, असेही ते म्हणाले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मनोगत व्यक्त करताना वणीच्या इतिहास पहिल्यांदाच अशी स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याने संयोजक ऍड कुणाल चोरडिया यांचे अभिनंदन केले. तसेच माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत ही स्पर्धा होत असल्याने माझ्यासाठी ही बाब गौरवास्पद असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक ऍड कुणाल चोरडिया यांनी केले. स्थानिक तसेच ग्रामीण भागातील खेळाडुंना चालना मिळावी, खेळाडु वृत्ती जागृत राहावी यासाठी या लीगचे आयोजन करण्यात आले, केवळ जिल्हाच नाही तर संपूर्ण विदर्भातील ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. असे मनोगत यावेळी ऍड कुणाल चोरडिया यांनी व्यक्त केले.
उद्घाटन प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी बॉलिंग केली. याचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटत मान्यवरांच्या खेळाला चांगलीच दाद दिली. कार्यक्रमाचे संचालन ओम सोनुने यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनिष गायकवाड यांनी मानले.
उद्घाटन झाल्यानंतर लगेच श्रीराम वॉरिअर्स X 11 टायगर्स रिअरिंग यांच्यात पहिल्या सामन्याला सुरूवात झाली. या चॅम्पियन लीगला मोठ्या संख्यने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन ऍड कुणाल चोरडिया यांच्यातर्फे करण्यात आले आहे
