
वरोरा तालुक्यातील चरूरखटी येथील एका महिलेची तिच्या मुलास वेकोलीत जनरल मजुरच्या नियुक्तीची ऑर्डर करून देण्याच्या बहाण्याने पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघड झाली असून दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आरोपीविरुद्ध कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी मोठे रॅकेट चे धागेदोरे मिळू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वरोरा तालुक्यातील चरूरखटी येथी सुनीता महादेव बेलेकर या महीलेची दोन एकर शेती माजरी अंतर्गत येणाऱ्या कोल माईंन एकोना करीता संपादित करण्यात आली. त्या शेतीच्या मोबदल्यात नोकरीची एक सीट व आर्थिक मोबदला देण्यात आला.30 जून 2022 नुसार वेकोली ने त्यांचा मुलगा प्रफुल्ल महादेव बेलेकर याला सुरक्षा रक्षक पदावर नियुक्तीचा आदेश वेकोलीने काढला होता.परंतु मुलाची आयटीआय परीक्षा असल्याने व त्याला जनरल मजूर पदावर नियुक्ती हवी असल्याने त्याने ऑर्डर घेतली नाही.यासाठी बंडू पंढरी नांदे यांच्या ओळखीच्या आणि एकोना कोळसा खाणीत कामावर असलेल्या युवराज मोरे यांनी मुलाला जनरल मजूर म्हणून नियुक्ती हवी असल्यास नागपूर वेकोली कार्यालयात अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर एका महिन्यात तुमच्या मुलाची ऑर्डर मी काढून देतो त्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. महिलेने 27 जुन -12 जुलै या काळात दोन आणि एक – एक लाख असे पाच लाख रुपये युवराज ईश्वर मोरे याला दिले .परंतु पैसे देऊनही जनरल मजूर पदाची ऑर्डर मिळाली नाही त्यामुळे फसवणूक झाल्याचें त्यांच्या लक्षात आले.युवराज मोरे याला पाच लाख रुपयांची रक्कम परत मागितली परंतु त्याने ती रक्कम परत करण्यास नकार दिल्याचा आरोप 13 ऑक्टोबर रोजी वरोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला होता.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून फसवणुकीतील रकम हस्तगत करण्यात आली. या प्रकरणात सापोले नामक इसमास नागपूर येथून अटक करण्यात आली. या प्रकरणात मोठे रॅकेट उघड होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.या प्रकरणाचा तपास वरोरा पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे स्वतः करीत आहे.
