कापूस वेचणीला मजुरच भेटेना, वेचणीला एक हजार रुपये क्विंटल

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात काही दिवसापासून मान्सून ने माघार घेतल्याने सोयाबीन कापणीसह काढणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या मात्र कापूस वेचणीची लगबग सुरू असून कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी एक हजार रुपये क्विंटलने वेचणी करावी लागत आहे.
तालुक्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून शेताला तळ्याचे स्वरूप आले होते त्यातूनही काही उरलीसुरली सोयाबीन व कपाशी पिके सावरल्याने आलेल्या कापूस वेचणीला तसेच सोयाबीन कापणीला मजूर मिळत नसल्याने काही शेतकरी तर सोयाबीन कापलेच नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून कडक ऊन तापत आहे तापत्या उन्हात कपाशीचे बोंड फुटल्याने शेतात पांढरा शालू पांघरल्याचे दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून कापूस वेचण्याची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस अनेक दिवस राहिल्याने अनेक शेतात सोयाबीन कापणी काढणीला विलंब झाला होता त्यामुळे शेतातील सोयाबीन पिकाची कापणी व काढण्याचे संपूर्ण कामे आटोक्यात आली असून सध्या कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने मजुराची मन धरणी करून मजुरांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये मजुरी मोजावी लागत आहे.

शेतकरी दुहेरी संकटात
अगोदरच पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्यादा दराने सोयाबीनची कापणी व काढणी तसेच कापूस वेचणी करावी लागत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहेम्हणून मजूर सोयाबीन सवंगणीकडे
सोयाबीन कापणीची मजुरी जास्त मिळत असल्याने मजूर सोयाबीन कापणी कडे वळले असून कापसाची वेचणी करण्याकरिता मजूर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दहा रुपयाच्या वर किलो प्रमाणे कापूस वेचणी करावी लागत आहे अन्यथा सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तीनशे रुपये रोजी प्रमाणे मजुरी देवून कापसाची वेचणी करावी लागत आहे

बाहेर गावातील मजूर
कापूस वेचणीला मजुराला घरून शेतात ये जा करण्यासाठी रिक्षा भाडे देण्याची वेळ सुद्धा शेतकऱ्यांवर आली असून बाहेरगाववरून जादा मजुरी देऊन मजूर आणावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडणारी झाली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.