ठेकेदारच बनले अधिकारी. प्रभाग क्रमांक 14 मधील मुख्य रस्त्याचे बांधकाम बोगस पद्धतीने. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी,होत असलेल्या विकास कामात अवसान नसल्याची चर्चा?

ढाणकी प्रतिनिधी – प्रवीण जोशी.


ढाणकी शहरातील मध्यवर्ती असलेल्या प्रभाग क्रमांक 14 मधील मुख्य रस्त्याचे बांधकाम अतिशय बोगस होत असून हे काम करणाऱ्या ठेकेदार व या कामाची गुणवत्ता पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
या कामा मध्ये गुणवत्तेचे सर्व निकष हे धाब्यावर बसवले असून रेती सुद्धा नाल्याची वापरण्यात येत असल्याने हा रस्ता किती दिवस टिकेल या वर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. सुशील वस्त्र भांडार ते तगडपल्लेवार चौक हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून दुर्गा देवी, गणपती तसेच इतर मिरवणूका जात असतात. त्यामुळे या रस्तावरून वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हा रस्ता गुणवत्तापूर्वक होणे अपेक्षित होते मात्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार या कामात अपहार करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रेती बरोबरच गोटा आणि मुरूम सुद्धा या कामात अतिशय हलका वापरण्यात आलेला असून आज पर्यंत कोणताही अधिकारी काम पाहण्यासाठी न आल्याने “हम बोलें सो कायदा,” या प्रमाणे आपल्या मनमानी पद्धतीने काम करत आहे. या आधीही ढाणकी नगरपंचायत च्या एका नगरसेविकेने याच ठेकेदाराविरुद्ध त्यांच्या प्रभागातील बोगस कामाची तक्रार दिली होती मात्र अधिकाऱ्यांचा त्या ठेकेदारावर वरद हस्त असल्याने ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही. या रस्त्याचे बांधकाम सुरु झाल्या पासून एकदाही क्यूरिंग केले गेले नसून नागरिकचं आपापल्या घरासमोर रस्त्यावर पाणी टाकून स्वतःच क्यूरिंग करत आहेत.त्याच प्रमाणे काम हे खूपच संथ गतीने होत असल्याने वाहतुकीस सुद्धा मोठा अडथळा निर्माण होत आहे. तरी अश्या बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करून हे काम दुसऱ्या ठेकेदारास देण्याची मागणी प्रभाग क्रमांक 14 मधील करत आहेत.

चौकट
रस्ताचे बांधकाम सुरु असताना काम हे गुणवत्ता पूर्वक होत आहे की नाही हे पाहण्यासाठी इंजिनियर यांनी वेळो वेळो साईट ला भेट देणे गरजेचे आहे. त्यामुळं काम चांगले होऊ शकते मात्र या रस्त्यावर इंजिनियर चे अद्याप ही पाय न लागल्याने “डाल मै कुछ काला” है अशी स्थिती असून यात अपहार होत असल्याने चर्चेने आता जोर धरला आहे.